नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पशुपतीकुमार पारस यांनी पुतणे आणि विद्यमान केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याशी मनोमिलन अवघड असल्याचे सूचित केले. आता खूपच उशीर झाला असल्याचे त्यांनी म्हटले.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी पारस यांना चिराग यांच्याशी पुन्हा सलोख्याचे नाते निर्माण होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. आता ते कधीच घडू शकणार नाही, असे उत्तर त्यांनी दिले. पक्ष फुटल्यानंतर एकत्र येऊ शकतात. पण, मनं दुरावल्यानंतर ती पुन्हा जुळू शकत नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
माजी केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू , तर चिराग पुत्र आहेत. पासवान यांच्या निधनानंतर काका-पुतण्यामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यानंतर दोघांमध्ये पक्षाच्या ताब्यावरून संघर्ष झाला. त्यातून लोजप फुटून त्या पक्षाचे दोन गट निर्माण झाले. त्या भिन्न गटांचे नेतृत्व आता पारस आणि चिराग करत आहेत. दोन्ही गट भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे (एनडीए) घटक आहेत. मात्र, दुरावा कायम राहणार असल्याचे सूतोवाच पारस यांनी केल्याने ते गट एकत्र येण्याची शक्यता मावळली आहे.