चूक दुरूस्त करण्याची वेळ आलीय…

-शरद पवार यांचे आवाहन; सातारी बाण्याने “त्यांची’ जागा दाखवून द्या
भरपावसात 79 वर्षांचा योद्धा…
मुसळधार पाऊस पडतोय, आपल्या
ला ऐकायला बिनछत्रीचे लोक मैदानात बसलेत, हे बघताच शरद पवार नावाचा हा योद्धा वयाच्या 79 व्या वर्षी छत्री न घेता कोसळत्या पावसात भाषण करतोय, हे चित्र अविस्मरणीय ठरले.

सातारा – सातारा लोकसभेच्या निवडणुकीत देण्यात आलेला उमेदवार चुकीचा होता आणि ती चूक माझ्याकडून झाली हे मी कबूल करतो. मात्र ती चूक दुरूस्त करण्याची वेळ आली आहे. येत्या 21 तारखेला सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांनी चुका करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून सातारी बाणा काय असतो हे दाखवा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्यासह विधानसभेच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित सभा “न भुतो ना भविष्यती’ ठरली. भरपावसात नागरिकांनी खुर्च्या डोक्‍यावर धरुन शरद पवारांचे भाषण ऐकल्यानंतरच मैदान सोडले आणि पवारांनी रात्री आठ वाजता सभामंचावर प्रवेश करुन भरपावसात मतदारांना आपले विचार ऐकवले. शरद पवार म्हणाले, “”साताऱ्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बऱ्याच वेळा घडणाऱ्या घडामोडींचा आढावा मला दिला जात होता. मात्र, आज काही गोष्टी ज्या चुकल्या, त्या मी तुमच्यासमोर प्रांजळपणे कबूल करतो. मात्र, ही लोकसभा व विधानसभेची निवडणूक परिवर्तन घडवण्यासाठीच आहे. ज्यांनी मतदारसंघाच्या विकासाच्या नावाखाली राजीनामा देऊन दुसरीकडे प्रवेश केला, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.”

हा जिल्हा शिवसंस्कारात वाढलेला आहे आणि येथे चुका करणाऱ्यांना माफी नसते. ज्यांनी चुका केल्या त्यांना त्यांची जागा दाखवा, येत्या 21 तारखेला सातारा जिल्ह्यातील तमाम मतदार बंधू, भगिनींनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सातारी बाणा चुका करणाऱ्यांना दाखवून द्या, असे आवाहन पवार यांनी करत भरपावसातच मतदारांना हात उंचावून अभिवादन केले. पावसाचा रागरंग पाहून उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी दोन वाक्‍यातच गावरान ठसका दाखवला. “ढगाला लागली कळं आणि राष्ट्रवादीला सगळी मतं मिळं,’ असे म्हणत त्यांनी दोनच मिनिटांत पावसाताही रंग भरले.

“राजघराण्यात जन्म हीच पुण्याई’
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर पवारांची वाट बघत व्यासपीठावर पावसातच भिजत बसून राहिले होते. पवारांच्या आगमनानंतर रामराजे यांनी माईकचा ताबा घेताच पावसाने जोर पकडला. तशाही पावसात रामराजेंनी बरेच दिवस मनात साठवून राहिलेली सल बोलून दाखवली. ते म्हणाले, “”मी आधीच साहेबांना म्हणालो होतो, साहेब ही “कॉलर संस्कृती’ आपल्याला परवडणारी नाही. हे कॉलरवाले पुन्हा पक्षात कधीच घेऊ नका, यांच्या चुका या अक्षम्य असून न सांगता येण्यासारख्या आहेत. केवळ राजघराण्यात जन्माला आले हीच यांची पुण्याई आहे.” बाकी कामेही अत्यंत चुकीची असल्याने यांच्याबद्दल काय बोलावे, असे म्हणत रामराजे यांनी सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.

पाऊस आणि पवार दोघेही बरसले
राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा परिषदेच्या मैदानावर झालेली सभा ही खऱ्या अर्थाने “पवार आणि पाऊस’ या दोघांमुळेच गाजली. झेडपीचे मैदान कार्यकर्त्यांनी ओथंबून वाहिले होते. सर्वजण शरद पवार साहेब कधी येणार, याची वाट बघत होते.

टप्प्याटप्प्याने आठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे आगमन होताना कार्यकर्त्यांच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शशिकांत शिंदे यांचे भाषण सुरु असताना काही जणांनी उठूनच “साहेब कुठे आहेत, त्यांना बोलवा,’ अशी भरपावसातच विचारणा केली. रात्री आठ वाजता शरद पवार यांचे आगमन झाले. पवारांना राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. नंतर भरपावसातच पवारांनी शेलक्‍या शब्दात महायुतीचा समाचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिट्ट्या मारत व पावसात खुर्च्या डोक्‍यावर धरत जल्लोष करायला सुरुवात केली.

पवार म्हणाले, “पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे दौरे पश्‍चिम महाराष्ट्रात होत आहेत. आणि मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात म्हणतात आमच्यासमोर कोणता पैलवानच नाही. तेव्हा मी त्यांना म्हणालो, “पैलवान वगैरे मला माहित नाही. मात्र, तुमच्याकडे जे पैलवान आहेत ते कुठले आहेत ते पहिलं बघा.’ पैलवानकी आणि कुस्ती ही भाषा भाजपच्या तोंडात शोभत नाही, असे सांगत पवारांनी फडणवीसांवर शरसंधान केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)