प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी मुहूर्त लागला ! ‘आरटीई’च्या रिक्त जागांवरील प्रवेशाला सुरुवात

पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) रिक्त राहिलेल्या प्रवेशाच्या जागांवर प्रतीक्षा यादीतील बालकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी अखेर मुहूर्त लागला आहे. त्यानुसार मंगळवार (दि.30) पासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 12 जूनपर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वंचित व दुर्बल घटकातील बालकांना “आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येते. विना अनुदानित शाळांमध्ये यासाठी 25 टक्के प्रवेशाच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील 8 हजार 823 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 846 प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. यासाठी 3 लाख 64 हजार 413 बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. यासाठी लॉटरीद्वारे 94 हजार 700 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. या निवड यादीतील बालकांची प्रवेश प्रक्रिया 22 मेपर्यंत पूर्ण झाली आहे. यात निवड यादीतील 64 हजार 256 बालकांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झाले आहेत.
राज्यात “आरटीई’च्या 37 हजार 590 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 बालकांना संधी मिळणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 25 हजार 890 बालकांची प्रवेशासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून ऍलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी लागणार आहे.
पडताळणी समितीकडे जावून या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करुन शाळांमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे. असे प्राथमिक शिक्षण संचालनालयातील सहसंचालक देविदास कुलाळ यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात प्रतीक्षा यादीद्वारे पुण्यात 4 हजार 494, ठाण्यात 2 हजार 975, औरंगाबादमध्ये 1 हजार 320, मुंबईमध्ये 1 हजार 745, नागपूरमध्ये 2 हजार 97, नाशिकमध्ये 1 हजार 368 याप्रमाणे बालकांची प्रवेशासाठी निवड झालेली आहे.





