सातारा – अभिनेते किरण माने गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता “स्टार प्रवाह’ वाहिनीवरील “मुलगी झाली हो’ या मालिकेतून आपल्याला बाहेर काढण्यात आल्याचा आरोप माने यांनी केल्यानंतर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात वाहिनीने निवेदन देत भूमिका मांडली आहे. माने यांच्या “मी’पणामुळे त्यांच्यावर मालिकेतून बाहेर जाण्याची वेळ आल्याचे स्पष्टीकरण वाहिनीने दिले आहे.
विशिष्ट राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत, ही कारवाई करण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. या घटनेनंतर अनेक कलाकारांनी पुढे येऊन माने यांना पाठिंबा दिला, तर दुसरीकडे राजकीय दबावाखाली येऊन मानेंना मालिकेतून काढण्यात आल्याच्या आरोपाचे निर्मात्यांनी खंडन केले आहे.
“मुलगी झाली हो’ ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रदर्शित होते.
मालिकेचे चित्रीकरण सुरुच
राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलाकाराला मालिकेतून बाहेर काढल्याने आम्ही मराठी चित्रपटसृष्टीचा निषेध करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या व मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी व “मुलगी झाली हो’ या मालिकेच्या टीमच्या आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला गुळुंब ग्रामपंचायत (ता. वाई) मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला यापुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही, अशा आशयाचे गुळुंबच्या सरपंचांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या संदर्भात मालिकेचे लाइन प्रोड्युसर सचिन ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता, आम्हाला असे कोणतेही पत्र ग्रामपंचायतीकडून देण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेले दीड वर्ष मालिकेचे चित्रीकरण गावात सुरू आहे. येथील नागरिक खूप चांगले असून, त्यांचे आम्हाला नेहमीच सहकार्य राहिले आहे. त्यांच्याकडून आम्हाला कोणताही त्रास नाही. त्यामुळे हे पत्र व्हायरल करण्यामागे दबावतंत्र असावे. मालिकेच्या चित्रीकरण सुरू आहे. त्यात कोणतेही विघ्न नाही. चित्रीकरणाला परवानगी नाकारायचीच होती, तर हे पत्र आम्हाला, पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला हवे होते; परंतु असे कोणतेही पत्र आम्हाला मिळालेले नाही, असे ससाणे यांनी नमूद केले.