‘ये पब्लिक हैं सब जानती है; हे कोणी विसरू नये इतकेच !’

मुंबई :  शिवसेनेचे मुखपत्र सामनातून केंद्र सरकारवर  जोरदार टीका करण्यात आली. महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

दरम्यान दररोज होत असलेल्या या इंधन दरवाढीला प्रथमच ब्रेक लागला कारण जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत 15 टक्के घसरण झाली त्यामुळे पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झाले. जागतिक बाजारातील दर घसरणीचे आणि ‘निमित्त’ आहे देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे, असा हा सगळा हिशेब आहे. अर्थात सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते हे कोणी विसरू नये इतकेच ! असे शाब्दिक फटकारे सामनाच्या अग्रलेखातून ओढण्यात आले आहेत.

‘देशातील कोरोना रुग्णांच्या वेगाने वाढणाऱया संख्येला जराही ‘ब्रेक’ लागताना दिसत नसला तरी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला मात्र प्रथमच किंचित ‘ब्रेक’ लागला आहे. गेल्या वर्षभरापासून वाढतच असलेले पेट्रोल-डिझेलचे दर बुधवारी आणि गुरुवारी प्रथमच काही पैशांनी खाली आले. त्यामुळे पेट्रोल 39 पैसे तर डिझेल 37 पैशांनी स्वस्त झाले. अर्थात, ही दरकपात होण्यामागे जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली 15 टक्के घसरण कारणीभूत आहे. म्हणजेच उद्या जागतिक बाजारात पुन्हा दरवाढ झाली तर आज मिळालेला दिलासा तात्पुरता ठरू शकतो. मुळात केंद्रातील सरकारचे धोरण इंधन दरवाढीबाबत ‘हाताची घडी तोंडावर बोट’ असेच गेले वर्षभर राहिले आहे. वर्षभरापासून इंधनाचे आणि घरगुती गॅसचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

दोन दिवस पेट्रोल-डिझेल काही पैशांनी स्वस्त झाले म्हणून ढिंढोरे पिटू नका. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले म्हणून आपल्या देशात इंधन दरकपात झाली आहे. आसाम- प. बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत इंधन महागाईच्या ‘फोडणी’चा ठसका लागू नये यासाठीही केंद्र सरकारची ही दरकपातीची मखलाशी असू शकते. म्हणजे ‘कारण’ जागतिक बाजारातील दर घसरणीचे आणि ‘निमित्त’ आहे देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे, असा हा सगळा हिशेब आहे. अर्थात सामान्य जनताही वेळ येताच सगळा हिशेब ‘चुकता’ करीत असते हे कोणी विसरू नये इतकेच!’अशी टीका आजच्या सामानातून केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.