लग्न घटिकांना होतोय उशीर….

सध्या राजकीय नेते, पुढारी यांची उपस्थिती लग्नात असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनत चालले असल्यामुळे अगदी लग्न पत्रिकांमध्ये देखील नेते मंडळींच्या नावांची रेलचेल असते. यामध्ये सर्वच पक्षांचे राजकीय नेते, पुढारी यांची नावे टाकण्यावर भर असतो. तालुक्‍यातील आजी-माजी पदाधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्या नावांचा भरणा अधिक असल्याचे चित्र दिसून येत आहे.

अशा पद्धतीने राजकीय नेते, पुढारी लग्न सोहळ्यांमध्ये आले तरच विवाह समारंभास भव्यदिव्य स्वरूपाच प्राप्त होत असल्याचा अविर्भाव वधू-वर दोन्ही बाजूच्या मंडळींचा असतो. मात्र, राजकीय नेत्यांची उपस्थिती असलीच पाहिजे व राजकीय नेते आणि पुढाऱ्यांच्या उपस्थितीतच लग्नसोहळा पार पडावा अशा अट्टहासापायी लग्नांना उशीर होत असल्याचेही चित्र आहे. लग्नसोहळ्यामध्ये केले जाणारे सत्कार समारंभ म्हणजे आपल्या राजकीय व सामाजिक प्रतिष्ठेचे ओंगळवाणे प्रदर्शन तर नाही ना, याचाही विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

रूढी, परंपरेनुसार मुला-मुलीच्या पसंतीनंतर मुहूर्त काढला जातो आणि त्या मुहूर्तावरच लग्न लागावे असे ठरविले जाते; पण पुढाऱ्यांच्या उपस्थितीच्या अट्टहासापायी खरंच किती लग्ने या ठरविलेल्या मुहूर्तांवर लागतात, हा संशोधनाचाच विषय आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवरील राजकीय नेत्यांना आपल्या राजकीय कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्यकर्ता हा जवळचाच असतो. मात्र, प्रत्येक कार्यकर्त्याला फक्त तालुक्‍यातीलच अथवा राजकीय नेत्यांच्या कार्यक्षेत्रातीलच सोयरीक मिळेल असे मात्र होऊ शकत नाही. त्यामुळे राजकीय नेत्यांनाही लग्नसमारंभांना उपस्थित राहण्यासाठी मोठी धावपळ करावी लागते. एकाच दिवशी जर अनेक लग्न असतील तर राजकीय नेते मंडळींची ही दमछाक होते. शेवटी वेळेची आणि अंतराची मर्यादा त्यांनाही येतात. कारण काही लग्न ही दूरची असतात, परंतु कार्यकर्त्यांची मर्जी राखणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे मग राजकीय नेत्यांनाही नाईलाजास्तव लग्नाला उशीर होतो, परंतु यामुळे लग्न सोहळ्याकरिता उपस्थित राहणारे हजारो वऱ्हाडी मंडळी यांना काहीच महत्त्व नाही का, असाही प्रश्‍न निर्माण होतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.