पाचही कसोटी खेळायला मिळणे अवघडच- स्टुअर्ट ब्रॉड

बर्मिंगहॅम: वेगवान गोलंदाजांवपर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि परिणामी त्यांना दुखापती होण्याची शक्‍यता टाळण्यासाठी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या प्रमुख वेगवान गोलंदाजांना भारताविरुद्धच्या आगामी मालिकेतील पाचही कसोटी सामन्यांमध्ये खेळविण्याची शक्‍यता नाही. स्टुअर्ट ब्रॉड याने स्वत:च ही कबुली दिली.

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचा भार गेल्या अनेक वर्षांपासून वाहणारा जेम्स अँडरसन आता 36 वर्षांचा झाला असून आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. गेल्या मोसमात झालेल्या खांद्याच्या दुखापतीतून सुटका करून घेण्यासाठी अँजरसनने तब्बल सहा आठवडे स्पर्धात्मक क्रिकेटमधून “ब्रेक’ घेतला होता. तसेच यंदाच्या मोसमातील पहिल्याच महिन्यातील कौंटी सामन्यात पायाच्या दुखापतीमुळे लंगडणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडवरही अतिरिक्‍त ताण देता येणार नाही. ब्रॉड सध्या 32 वर्षांचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकदिवसीय सामन्यात किंवा टी-20 सामन्यात गोलंदाजाला कमाल 10 किंवा 4 षटके टाकावी लागतात. मात्र कसोटी सामन्यात खेळपट्टीचे स्वरूप, हवामान आणि प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची कामगिरी यावर सारे काही अवलंबून असते. तरीही एक कसोटी सामना सुमारे 450 षटकांचा असतो, असे गृहीत धरल्यास एका संघातील गोलंदाजांना 250 षटके टाकावी लागण्याची शक्‍यता असते, असे सांगून ब्रॉड म्हणाला की, त्यातील निम्म्याहून अधिक षटके वेगवान गोलंदाजांना टाकावी लागतील, असे म्हटल्यास वेगवान गोलंदाजाने सहा आठवड्यांत सलग पाच कसोटी सामने खेळणे जवळजवळ अशक्‍यप्राय आहे.

एखाद्या खेळपट्टीवर चेंडू काटकोनात वळत असल्यास वेगवान गोलंदाजांवर तितका ताण येणार नाही. परंतु हिरव्यागार खेळपट्टीवर किंवा चेंडू रिव्हर्स स्विंग होत असलेल्या वातावरणात आम्हाला एका डावांत 60 ते 80 षटके टाकावी लागण्याची शक्‍यता असते, असे सांगून ब्रॉड म्हणाला की, इतक्‍या ताणामुळे दुखापतींची शक्‍यता असल्याचे गृहीत धरून जेम्स अँडरसन आणि मला आळीपाळीने खेळविण्याचा प्रयोग केला जाऊ शकतो. इंग्लंडच्या संघव्यवस्थापनाने ही कल्पना याआधीच आपल्या कानावर घातली असल्याचेही त्याने उघड केले.

हा तर नियोजनाचाच भाग

एका कसोटीत तुम्हाला वगळण्यात आल्यास तो वैयक्‍तिकरीत्या लक्ष्य करण्याचा प्रकार नाही. किंवा तुम्हाला वाईट कामगिरीमुळे वगळण्यात आलेले असेल असेही नाही, असे संघव्यवस्थापनाने आम्हाला स्पष्ट केले आहे, असे सांगून ब्रॉड म्हणाला की, सर्वोत्तम कामगिरी करता येण्यासाठी वेगवान गोलंदाजांना पुरेशी विश्रांती मिळावी आणि दुखापतीही टाळता याव्यात, यासाठीच ही योजना असल्याचे व्यवस्थापनाने आम्हाला सांगितले आहे.

अर्थात वाईट कामगिरीमुळे संघातून वगळण्याची पाळी आपल्यावर कधीही येऊ नये, याकरिता आपण काळजी घेत असल्याचेही ब्रॉडने सांगितले. किंवा आपल्याला पुन्हा कौंटी क्रिकेटमध्ये खेळून संघात निवड करून घेण्याची सूचना देण्याची वेळ संघव्यवस्थापनावर येऊ नये, असाही आपला प्रयत्न आहे, असे सांगून ब्रॉड म्हणाला की, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपुरते बोलायचे झाल्यास पाच कसोटी सामन्यांच्या प्रदीर्घ मालिकेसाठी संघात काही बदल करीत राहावे लागणार हे खेळाडूंनी समजावून घेण्याची गरज असल्याचे स्पष्टीकरण संघव्यवस्थापनाने आम्हाला दिले आहे आणि तेवढे पुरेसे असल्याचे माझे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)