कठीण आहे! तुटवडा कायम, लसीकरण आजही बंदच

पुणे: करोना प्रतिबंधक लसच उपलब्ध नसल्याने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारीही लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.

गेल्या तीन ते चार दिवसांत महापालिकेला लसच मिळाली नसल्याने, लसीकरण मोहीम पूर्णपणे बंद झाली आहे. रविवारीही संपूर्ण जिल्ह्यात केवळ 2 हजार 752 जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यामध्येही ग्रामीण भागात केवळ 30 जणांनाच, पुणे महापालिका हद्दीत 1 हजार 143 जणांना तर पिंपरी-चिंचवड मध्ये 1 हजार 579 जणांनाच लस टोचण्यात आली.

यानंतर लसच उपलब्ध नसल्याने सोमवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. तसेच, लसच उपलब्ध होणार नसल्याने मंगळवारीही सर्व लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटासाठीचा पहिला डोस देणे राज्य सरकारने कधीच स्थगित केले होते.

जो साठा शिल्लक होता, तो 45 वर्षे वयाच्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार उरलेले सगळे डोस या नागरिकांना दिले गेले. तरीही अद्याप सहा लाख कोविशिल्ड घेतलेल्या आणि 66 हजार कोवॅक्‍सिन घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक आहेत.

राज्य सरकारकडेच लसींचा पुरवठा झालेला नाही. लसींची पुढील खेप कधी येणार याची अद्याप काहीच माहिती नाही. त्यामुळे पुढील वितरण तूर्त थांबले आहे.
– डॉ. दिलीप पाटील, राज्य लसीकरण प्रमुख

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.