स्वस्त असतं ते मस्तच असतंच असे नाही, म्हणूनच जग फसतं (भाग-२)

स्वस्त असतं ते मस्तच असतंच असे नाही, म्हणूनच जग फसतं (भाग-१)

आता अगदी याउलट एक उदाहरण मला इथं नमूद करावंसं वाटतंय, ते म्हणजे रोल्टा या कंपनीच्या शेअर्सचं. केतन पारेखच्या तेजीत पुण्यातील नामवंत अशा एका मिरची व्यापाऱ्यानं खूप वरच्या भावात म्हणजे जवळपास नऊशे रुपयांच्या भावात कांही लाख शेअर्सची खरेदी केली. त्याचं भलंमोठं पे-इन करण्यासाठी अगदी मार्केटयाडेमधील सर्व गाळे देखील गहाण ठेवले होते परंतु केवळ तीनच महिन्यांत त्याचा भाव 200 रुपयांवर आला व पुढील दीडच वर्षांत 35 रु. मिरची व्यापाऱ्यांत किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीस अपरिचीत अशा धंद्यातील एका चुकीच्या व्यवहारानं चांगलंच पाणी दाखवलं. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. तशीच आज गरज आहे ती म्हणजे प्रत्येक गोष्टीची आपली स्वतःची गरज-आवश्‍यकता जोखण्याची. पहा, दूध व दारू दोन अगदी टोकाच्या गोष्टी. तसं पाहता लोकांना जास्त गरज असते दुधाची परंतु भल्या पहाटे रोज दूधवाला इमानेइतबारे कष्टानं तुम्हांला दूध पुरवताना दिसतो परंतु दारू ही चैनीची व वाईट गोष्ट असूनदेखील वाईन शॉपच्या बाहेर आपणास प्रत्येक वेळी गर्दी आढळते.

आज बाहेर परिस्थिती अशी आहे की लाख रुपये पगार घेणारी व्यक्ती देखील 50-60 हजार पगारात तेच काम करायला तयार आहे. म्हणजे प्रश्न आहे की नक्की त्या व्यक्तीच्या कामाच्या मोबदल्याचं मूल्य काय आहे ? जर आपल्याला स्वतःला स्वतःची किंमत ओळखता आली तर आपण नक्कीच समाधानी राहू शकतो.

आज खरी गरज आहे ती थक म्हणजे का, कशासाठी, काय, केव्हा, कोठे, कसं यांची उत्तरं शोधण्याची. बाहुबली 1या चित्रपटानंतर शेवटी एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होता तो म्हणजे कटाप्पानं बाहुबलीला ‘का’ मारलं ? याच ‘का’चं उत्तर शोधण्यासाठी त्या चित्रपटाच्या सिक्वेलनं त्याच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी भारतात सुमारे 125 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. अगदी आपणही एक गुंतवणूकदार म्हणून हेच करणं जरूरी आहे. कोणताही शेअर घेताना तो आपण का घेतोय ? कशासाठी घेतोय ? कोणत्या कंपनीचा म्हणजे काय घेतोय किंवा कोठे गुंतवणूक करतोय ? तो केंव्हा विकण्याच्या उद्देशानं घेतोय आणि त्या गुंतवणुकीमधून आपल्याला काय साध्य करायचंय,यांची उत्तरं अभ्यासपूर्वक शोधल्यास व त्याप्रमाणं गुंतवणूक केल्यास यश हे आपलंच असणार.

Leave A Reply

Your email address will not be published.