बॅंकॉक – थायलंडमधील एका महिलेने फक्त 164 रुपयांना खरेदी केलेल्या एका शिंपल्यामध्ये तब्बल 50 लाख रुपये किमतीचा एक नारंगी रंगाचा दुर्मिळ मोती आढळून आला आहे. त्यामुळे या महिलेला लॉटरीच लागली आहे. थायलंडमध्ये बहुतांशी नागरिक सीफूड पसंद करतात गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येक जण आपापल्या खिशाप्रमाणे समुद्रातील प्राण्यांना खरेदी करून आवडीच्या डिश तयार करतात.
या महिलेनेही थायलंडमधील सपुन नावाच्या शहरातील एका बाजारामध्ये फक्त 70 बात म्हणजेच 164 रुपयांना एक शिंपला खरेदी केला होता. तेव्हा तिला कल्पना नव्हती की हा शिंपला आपल्या आयुष्याची दिशाच बदलून टाकणार आहे. संध्याकाळी ही महिला जेव्हा भोजन बनवण्यासाठी या शिंपल्याला कापत होती तेव्हा एका शिंपल्यामध्ये तिला नारंगी रंगाची एक वस्तू सापडली. पण तिला तो एखादा दगड असावा असे वाटले नंतर तिच्या लक्षात आले की तो दगड नसून एक दुर्लभ असा मोती आहे.
तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. अडीच सेंटीमीटर व्यासाच्या या मोत्याचे वजन सहा ग्रॅम आहे प्रारंभी या महिलेच्या परिवाराने या मोत्याबाबतची बातमी लपवून ठेवली होती. पण आपल्या आजारी आईच्या उपचारासाठी पैसे उपलब्ध करण्यासाठी या महिलेने हा मोती विकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही बाब समोर आली. यामुळे त्याला लवकरच एखादा चांगला खरेदीदार उपलब्ध होईल अशी आशा आता या कुटुंबाला वाटत आहे. या परिसरात नेहमीच अशाप्रकारचे मोती सापडत असल्याने त्याला चांगली किंमत येईल अशी आशा या कुटुंबाला वाटत आहे. गेल्याच महिन्यात एका मच्छीमाराला शिंपल्यामध्ये तब्बल सत्तर लाख रुपये किमतीचा मोती सापडला होता