“अवघड सोपे झाले हो’! यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी सुरू

दहा मजुरांचे काम तासभरात 

कामशेत – मावळ तालुक्‍यात सध्या भात कापणीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने उघडीप दिल्यानंतर काही ठिकाणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भात कापणी सुरू केली आहे. कामशेत परिसरात यंत्राद्वारे भात कापणी करण्यात येत आहे. सध्या शेतकरी “रिपर’ नावाचे यंत्र भात कापणीसाठी वापरत आहेत. हे यंत्र एका तासात एक एकर क्षेत्राची कापणी करते. वजन हलकं आणि चिखलात अडकून बसत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची यंत्राद्वारे भात कापणीला पसंती देत आहे. यंत्राद्वारे भात कापणीमुळे उत्पादक शेतकऱ्यांची मजुरीचा खर्च वाचतो. त्यामुळे बहुतेक शेतकरी यंत्राद्वारे भात कापणी करून कमी कालावधीत अधिक भात कापणी करण्यावर भर देत आहेत.

शेत मजुरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाकडून आत्मा (कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा) अंतर्गत “उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’मधून कृषी यांत्रिकीकरणावर कृषी विभागाने भर देऊन शेती उपयोगी भात लावणी, भातपीक कापणी, झोडपणी व अन्य आधुनिक यंत्र खरेदीसाठी अनुदान दिल्याने मावळत ही आधुनिक यंत्रे अनेकांनी घेतली आहेत. यामुळे भात कापणीचे अवघड काम अगदी सोपे झाले आहे. हे यंत्र 10 मजुरांचे दिवसभराचे काम एका तासात करत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला आहे.

यांत्रिकीकरणामुळे भात उत्पादक शेतकरी तंत्रज्ञानाची कास धरून नफ्याच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरवात झाली आहे. यांत्रिकीकरण झाल्याने उत्पादन खर्च कमी झाला आहे. पण आता भात पिकास योग्य बाजार मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. यावर्षी भातास काय बाजार असणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

शेतात पिकलेल्या भात पिकाचा दर्जा व त्यानुसार मिळणाऱ्या बाजारावरून शेतकऱ्यांची उन्हाळ्यात घ्यावयाच्या पिकांसाठी लागणारे भांडवल निर्माण होत असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.