न्यूयॉर्क : करोनामुळे जगात सर्वजण हतबल झाले आहेत. त्याला रोखण्यासाठी लसीकरणाची मोहीम जगभरात सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, करोना झालेल्या रुग्णांना मानसिक समाधान मिळावे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत. त्यातच अमेरिकेत करोना रुग्णांना मानसिक समाधान मिळण्यासाठी गाईला मिठी मारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
अमेरिका आणि युरोपमध्ये अनोखा पर्याय शोधून काढला आहे. लोक मानसिक शांतीसाठी गाईला मिठी मारत आहे. त्यासाठी अनेकजण २०० डॉलरपर्यंत पैसेही मोजत आहेत. काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अमेरिकेतील लोक गाईला मिठी मारण्यासाठी प्रति तास २०० डॉलरपर्यंत म्हणजे १४,५०० रुपये खर्च करत आहेत. भारतात गाईंना सर्वश्रेष्ठ मानले जाते. हजारोवर्षापासून गाईंची पूजा केली जाते.
गाईला मिठी मारल्याने केवळ मानसिक तणाव दूर होतो असं नाही तर यामुळे निरोगी राहण्यासही खूप फायदा होत असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात गाईला गोंजारणं आणि तिला कवेत घेणे ही जुनी परंपरा आहे. आता जगात सध्या हा ट्रेंड बनला आहे.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की, गाईला मिठी मारल्यानं घरात एका लहान मुलाला आणि पाळीव प्राण्याला पाळल्याची जाणीव होते. एक मिठी हार्मोन ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामाइनच्या ट्रिगरचं काम करतं. कोर्टिसोल कमी करतं. त्यासोबत तणावाची पातळी, चिंता आणि अस्वस्थपणाचं लक्षणही यामुळे कमी होत असल्याचे डॉक्टर सांगतात.