3 ते 30 जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत ः यंदा 2 हजार 192 जागा घटल्या
पुणे – शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयने शुक्रवारी जाहीर केले. आयटीआय प्रवेश यंदाही ऑनलाइन पद्धतीने होत असून अर्ज करण्यासाठी 3 जून ते 30 जून अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक माहितीपुस्तिका वाचून ऑनलाइन अर्ज भरावेत, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली. दरम्यान, यंदा आयटीआयच्या 2 हजार 192 जागा कमी झाल्या आहेत.
अर्ज कसा करावा
राज्यातील सर्व आयटीआय संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील. तेथून प्रवेशाची माहितीपुस्तिका प्राप्त करू शकतील. ऑनलाइन अर्ज 3 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध असतील. ऑनलाइन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते, त्याचा नोंदणी क्रमांक हाच युजर आयडी म्हणून तयार होईल. अर्ज भरल्यानंतर तात्पुरत्या प्रवेश अर्जाची छापील प्रत घ्यावी व प्रवेश अर्ज निश्चित करावा. प्रवेश अर्ज व प्रवेश निश्चितीसाठी प्रमाणपत्रे संबंधित आयटीआय संस्थेत सादर करावीत. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर अर्ज निश्चितीकरण पावती व निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत संस्थेमार्फत देण्यात येतील. त्यानंतरच अर्जाचा फेरीसाठी विचार करण्यात येईल.
मोबाइल नंबर बदलू नका
आयटीआय संपूर्ण प्रवेशप्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना वेळोवेळी “एसएमएस’द्वारे माहिती व ओटीपी कळविण्यात येईल. तथापि, विद्यार्थ्यांनी आपला मोबाइल क्रमांक बदलू नये.
आयटीआय प्रवेश वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज करणे : 1 ते 30 जून
प्रवेश अर्ज कन्फर्म करणे : 6 जून ते 1 जुलै
पहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : 6 जून ते 1 जुलै
प्राथमिक गुणवत्ता यादी : 4 जुलै रोजी सकाळी 11
गुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : 4 ते 5 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : 9 जुलै रोजी सायं. 5 वाजता
पहिली प्रवेश फेरी : 11 जुलै ते 15 जुलै
दुसरी प्रवेश फेरी : 12 ते 16 जुलै
तिसरी प्रवेश फेरी : 21 ते 25 जुलै
चौथी प्रवेश फेरी : 31 जुलै ते 1 ऑगस्ट
समुपदेशन फेरी : 12 ऑगस्ट