आयटीआय प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

ऑनलाइन प्रवेश अर्ज व अर्जात दुरुस्तीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

 

पुणे – राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले. ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे व अर्जात दुरुस्ती करणे, शुल्क भरणे यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. दरम्यान, येत्या 31 डिसेंबरपर्यंत सर्व फेऱ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

राज्यात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आयटीआयचे प्रवेशही रखडले होते. अखेर राज्य शासनाने प्रवेश प्रक्रियेचा मार्ग खुला केला आहे.

एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आरक्षण न ठेवता ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी संस्थांनी 30 नोव्हेंबरपर्यंत रोज सकाळी 10 ते 11 या वेळेत सत्र आयोजित करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे.

सर्व सुट्टीच्या दिवशीही मार्गदर्शन सत्र व प्रवेश प्रक्रियेसंबंधी कार्यवाही सुरू राहणार आहे, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.