नवी दिल्ली – सिगारेट उत्पादक क्षेत्रातील आयटीसी या प्रख्यात कंपनीचे अध्यक्ष व उद्योग क्षेत्रातील एक अग्रणी वाय सी देवेश्वर यांचे आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. कंपनीचे सीईओ म्हणून ते 2017 सालीच निवृत्त झाले होते पण ते कंपनीत नॉन एक्झीक्युटीव्ह अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
उद्योग क्षेत्रात काम करताना त्यांनी सर्वसमावेशकतेचे तत्व अंगीकारले होते. त्यांच्यामुळे या उद्योगात अनेक गरीबांना रोजगार मिळू शकला होता. त्यांनी आयटीसी मध्ये 1968 मध्ये प्रवेश केला त्यांच्या निष्ठेमुळे आणि अविरत कष्टामुळे त्यांना1984 मध्ये कंपनीच्या संचालक मंडळावर घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी कंपनीचे सीईओ आणि अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
भारतीय उद्योग जगतातील सर्वाधिक काळ टॉप एक्झिक्युटिव्ह राहिलेले अधिकारी म्हणून त्यांची गणना होत आहे. त्यांच्या कर्तबगारीमुळेच कंपनीची उलाढाल 2017-18 मध्ये सुमारे 45 हजार कोटी रूपयांवर गेली होती व कंपनीच्या त्या वर्षातील नफ्याचे प्रमाण 11 हजार 223 कोटींवर गेले होते.