कॉंगोमध्ये इटलीच्या राजदूताची हत्या

किन्शासा (कॉंगो) – कॉंगोतील इटलीचे राजदूत ल्युका ऍटेन्सिओ यांची कॉंगोमध्ये हत्या करण्यात आली आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या समवेत इटलीतील पोलीस अधिकारी आणि कॉंगो नागरिकत्व असलेला चालकही ठार झाला. कॉंगोच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्थानिकांना ही माहिती दिली.

कॉंगोच्या पूर्वेकडील प्रांताची राजधानी गोमा येथून रुत्सुरु येथे “वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या स्कूल फीडिंग प्रोजेक्‍टला भेट देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. संयुक्‍त राष्ट्राच्या एजन्सीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. ल्युका ऍटेन्सिओ हे 2017 पासून कॉंगोमध्ये राजदूत होते.

ज्या रस्त्यावर हा हल्ला झाला तो प्रवासासाठी सुरक्षित असल्याचे पूर्वीच सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले होते. तरीही हा हल्ला झाला. त्यामुळे या हल्ल्याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात असल्याचे “वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’ने म्हटले आहे.

इटलीच्या राजदूतासह या वाहनात पाच जण होते. वाटेत हल्लेखोरांनी वाहने ताब्यात घेतली आणि नंतर जवळच्या झाडाझुडपांमध्ये नेली. ही वाहने नंतर स्थानिक नागरिकांनी ओळखली आणि अधिकाऱ्यांना त्याबद्दल कळवले. थोड्याच वेळात विरुंगा नॅशनल पार्कचे कांगोली सैन्य आणि पार्क गार्ड बचावासाठी आले. त्यानंतर सुरक्षा रक्षक आणि हल्लेखोरांमध्ये चकमकही झाली.

हल्लेखोरांनी ऍटेन्सिओ आणि त्यांच्या अंगरक्षकाला गोळ्या घातल्या. त्यामध्ये कॅरेबिनेरी अधिकारी व्हिटोरियो आयकोव्हाची आणि त्यांचा ड्रायव्हर ठार झाले. जखमी झालेले ऍटेन्सिओ यांचा नंतर मृत्यू झाला. वाहनांच्या ताफ्यातील जखमी झालेल्या इतरांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हा हल्ला उत्तर किवमधील नयरागोंगो या प्रदेशात झाला. तीन अँटेना म्हणून ओळखले जाणाऱ्या याच भागात 2018 मध्ये अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी ब्रिटनच्या दोन नागरिकांचे अपहरण केले होते,

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.