पूर ओसरण्यास तीन दिवस लागणार

डॉ. दीपक म्हैसकर यांनी व्यक्‍त केली शक्‍यता

पुणे – अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत असले तरी धरणात 6 लाख 45 क्‍युसेकने पाण्याचा येवा जमा होत आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर येथे धोक्‍याची पातळी कायम आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूर ओसरण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर म्हणाले, “कोल्हापूर आणि सांगली शहरातील धोक्‍याची पाण्याची पातळीपेक्षा 6 ते 7 फुटाने जास्त आहे. ती आता ओसरण्यास सुरवात झाली आहे. एक तासाला एक इंचाने पाण्याची पातळी कमी होत आहे. शनिवारपासून रविवारपर्यंत सुमारे 2 फुटाने पाण्याची पातळी कमी झाली आहे. हळूहळू पूर ओसरण्यास सुरवात झाली आहे. अलमट्टी धरणातून यापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करणे शक्‍य नाही. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाऊस झाला नाही, तर पूर ओसरण्यास मदत होईल.

महामार्गावरील वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही. परंतु रविवारी सकाळी कोल्हापूर येथे जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारा एक ट्रक पोहोचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. “सध्या स्थलांतरितांची संख्या ही 4 लाख 41 हजार 845 एवढी आहे. त्यामध्ये कोल्हापूर येथील 2 लाख 45 हजार 229, सांगली 1 लाख 58 हजार 970, तर सातारा 10 हजार 486 आणि सोलापूर 27 हजार 999, तसेच पुणे शहरात 161 व्यक्‍तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

मृतांची संख्या 40 वर
अतिवृष्टीमुळे मागील आठ दिवसांत पुणे विभागात मृत झालेल्यांची संख्या 40 वर गेली आहे. तर अजूनही 3 व्यक्‍ती बेपत्ता आहेत. त्यामध्ये ब्रह्मनाळ येथील बोट बुडून झालेल्या दुर्घटनेतील मयत व्यक्‍तींची संख्या 12 होती. नव्याने 5 मृतदेह सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.