पुण्यातील तयार घरे विकण्यास लागणार 27 महिने

विक्रीचा जोर वाढला तरी पुरेसा नाही!

पुणे – गेल्या एक-दोन तिमाहीपासून सदनिकांची विक्री काही प्रमाणात होत असली तरी या वेगाने विक्री झाल्यास पुण्यातील तयार सदनिकांची पूर्ण विक्री होण्यास 27 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. पुण्यात आज घडीला तयार परंतु न विकल्या गेलेल्या 92 हजार 560 सदनिका आहेत.

7 मोठ्या शहरातील आकडेवारीचे संकलन व विश्‍लेषण करून “अनारॉक’ या संस्थेने हा दावा केला आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, आता काही प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. मात्र, नव्या घराचा पुरवठा मर्यादित केला आहे. दोन-तीन वर्षांमध्ये अजिबात विक्री न झाल्यामुळे अनेक विकसकांनी सदनिका विकण्यासाठी बऱ्याच सवलती आणि योजना देऊ केल्या होत्या. त्याचबरोबर घरांच्या किमतीही कमी केल्या होत्या. आता थोडीशी तेजी दिसू लागली असल्यामुळे आगामी काळात घरांचे दर घटण्याची शक्‍यता कमी आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने देऊ केलेल्या 20 हजार कोटींच्या निधीमुळे रखडलेले प्रकल्प पूर्ण होणार आहेत.

महत्त्वाच्या शहरातील न विकल्या गेलेल्या सदनिका
देशातील दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणे शहरांत सप्टेंबर अखेरीस तयार परंतु न विकल्या गेलेल्या 6 लाख 56 हजार सदनिका आहेत. एखाद्या शहरातील तयार घरांची इन्व्हेंटरी 18 ते 24 महिन्यांची असेल तर, ती नियमित बाब समजली जाते. त्यापेक्षा जास्त कालावधी लागणार असेल तर परिस्थिती खराब समजली जाते. समाधानाची बाब म्हणजे यावर्षी विक्रीचा जोर वाढत असून आगामी काळातही तो वाढण्याची शक्‍यता आहे. मुंबईत न विकल्या गेलेल्या घरांची संख्या 2 लाख 21 हजार, दिल्लीत 1 लाख 77 हजार, बंगळुरूमध्ये 63 हजार 542, कोलकता येथे 45 हजार 570 तर चेन्नईत 31 हजार 380 आहे. हैदराबाद येथील परिस्थिती त्या तुलनेत बरी आहे. या ठिकाणी 20 हजार 890 घरांची विक्री होणे बाकी आहे.

निधीचे लवकर वाटप होण्याची गरज
केंद्र सरकारने रखडलेल्या प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात जाहीर केला आहे. हा निधी लवकरात लवकर मूर्त स्वरुपात येण्याची गरज आहे. त्याचबरोबर हा निधी कोणत्या रखडलेल्या प्रकल्पासाठी कशा पद्धतीने दिला जाईल याची माहिती मिळण्याची गरज आहे. जेणेकरून संबंधित विकसक निधी वितरण करणाऱ्या संस्थेकडे आपला प्रस्ताव दाखल करतील, असे अनुज पुरी यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.