खंडाळ्यातील त्या 14 गावांना पाणी देणार

ना. गिरीश महाजन यांची ग्वाही : सर्वेक्षण करण्याचे आदेश

कवठे  – हक्क असूनही पाण्यापासून वर्षानुवर्षे वंचित राहिलेल्या खंडाळा तालुक्‍यातील 14 गावांना पाणी देणारच. पाणी प्रश्‍नाबाबत आम्ही प्रथमपासूनच धडाडीने व प्राधान्याने कार्यवाही करत आलो आहोत. विशेषत: खंडाळा तालुक्‍याने आजपर्यंत मोठा त्याग केला आहे. औद्योगिकरणाच्या जागतिक नकाशावर वेगाने पुढे येत असलेल्या या तालुक्‍यातील गावांना किमान पाणी मिळू नये ही वेदनादायी बाब आहे. त्यामुळेच आपण तातडीने या गावांना पाणी मिळण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश देत आहोत. अहवाल प्राप्त होताच कार्यवाही करुन या चौदाही गावांमध्ये पाणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी मदन भोसले यांना दिली.

किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मदन भोसले यांनी खंडाळ्यातील 14 गावांच्या पाणी प्रश्‍नाबाबत संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री ना. गिरीष महाजन यांची मुंबई येथे त्यांच्या निवाससनथानी भेट घेतली. यावेळी मदन भोसले म्हणाले, खंडाळा तालुक्‍याच्या वरील बाजूस भाटघर, निरा देवघर अशी मोठी धरणे आहेत, असे असूनही या तालुक्‍यातील अतीट, कर्णवडी, घाडगेवाडी, लोहोम, झगलवाडी, लिंबाचीवाडी, कण्हेरी, आसवली, अंबारवाडी, पवारवाडी, वाण्याचीवाडी, हरळी, घाटदरे, धावडवाडी अशा 14 गावांना कोणत्याही योजनेतून पाणी न मिळाल्याने ही गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. आधीच दुष्काळग्रस्त असणाऱ्या खंडाळा तालुक्‍यात हक्काचे पाणी मिळत नसल्याने या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

निरा देवघर योजनेतून पाणी मिळावे अशी मागणी गेली अनेक दिवस या सर्व गावांकडून होत आहे. त्यामुळे या गावांना दुष्काळमुक्‍त करण्यासाठी निरा देवघर योजनेतून पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी या प्रकल्पातून उपसा योजनेतून पाणी देण्यासाठीचे काम हाती घ्यावे.
यावेळी ना. महाजन यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करत मदन भोसले यांच्याकडून माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या निवेदनावर जाग्यावरच योजनेच्या सर्व्हेक्षणाचे आदेश जारी केले. जलसंपदा मंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल मदन भोसले यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी भाजपा नेते अनिल जाधव, केतन भोसले, किसन वीर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे,राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सतीश भोसले, ईशान भोसले, विनोद जाधव उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)