पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आणणार

सातारा -“उपरा’कार, पद्मश्री लक्ष्मण माने यांच्यामुळे राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पोहोचेल. त्यांचे प्रश्न आम्ही सरकार दरबारी मांडू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादीला गतवैभव आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सोमवारी मुंबई येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पाटील बोलत होते. लक्ष्मण माने यांच्यासमवेत विलास माने, नारायण जावलीकर, शारदाताई खोमणे, अशोकराव जाधव यांच्यासह 18 जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. कार्यक्रमास आ. राजेश टोपे, आ. बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष सुरज चव्हाण उपस्थित होते.
“राज्यातील भटक्या विमुक्त वंचित घटकांसाठी लक्ष्मण माने गेली अनेक वर्ष काम करत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेली 30 ते 40 वर्ष वाड्यावस्त्यांवर जाऊन वंचित घटकांना एकत्र करत आहेत. त्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघर्ष करत आहेत. न्याय मिळालेला नाही असा अजूनही मोठा वर्ग समाजात आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे,’ असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी अल्पसंख्याक विकास आणि सामाजिक न्याय ही दोन खाती हक्काने मागून घेतली होती. दोन्ही खात्यांमार्फत समाजातील उपेक्षित घटकाला न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने केले, असेही पाटील यांनी सांगितले.
लक्ष्मण माने यांनी सुचवल्यानंतर 33 वेगवेगळ्या जातींचा उल्लेख अर्थसंकल्पात करुन त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली. त्यावेळी महाराष्ट्राचा सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प म्हणून तो प्रसिद्ध झाला. त्यावेळी वंचितांपर्यत पोहोचून आम्ही जे काम केले त्यामुळे 2004 मध्ये विक्रमी संख्येने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निवडून आले, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी राजेश टोपे, बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
लक्ष्मण माने म्हणाले, “हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. छत्रपती शाहू महाराजांचे जन्मशताब्दी वर्ष असून या वर्षाचे निमित्त साधून 31 ऑगस्ट रोजी विमुक्त दिन साजरा करायचा आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे.’ भारताची लोकशाही सध्या धोक्यात असून आपला लढा संविधानविरोधी शक्तींच्या विरोधात आहे. हा लढा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन माने यांनी केले.




