तरुणांना सैन्य भरतीसाठी आयुधे प्रेरणा देतील

डॉ. पी. जे. एस. पन्नू; लष्कराच्या विमान व रणगाड्याचे लोकार्पण उत्साहात

कराड – 1971 सालच्या बांगला मुक्ती स्वातंत्र संग्रामात विमान व रणगाडा या दोन्ही आयुधांचा प्रत्यक्ष वापर झाला होता. कराडात गेली एकवीस वर्षे साजरा होणारा विजय दिवस समारोह आणि देशाचे संरक्षणमंत्री पद ज्यांनी सांभाळले, अशा स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विजय दिवस समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी सैन्य दलाकडे पाठपुरावा करुन रणगाडा व विमान मिळवले आहे.

ही आयुधे कराड शहर व परिसरातील तरुणांना लष्करात भरती होण्यासाठी प्रेरणा देतील, असे उद्‌गार लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांनी काढले. कराड नगरपरिषद व विजय दिवस समारोह समितीच्या वतीने येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन आवारात बसवण्यात आलेल्या रणगाडा आणि विमानाचे लोकार्पण शुक्रवारी लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी कर्नल जयराम, मेजर वास्को, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, विजय वाटेगावकर, अतुल शिंदे, सौरभ पाटील, फारुक पटवेकर, वैभव हिंगमिरे, बाळासाहेब यादव, मोहसिन आंबेकरी, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह नागरिक, महिला व विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी नारीशक्‍ती व तिरंगा बाईक रॅली शहरातून काढण्यात आली. त्यानंतर देशभक्‍तीपर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. नगरपरिषदेच्या वतीने लेफ्टनंट पन्नू यांना मानपत्र देण्यात आले.

ले. जनरल पन्नू म्हणाले, ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भरलो पाणी हे गीत आपण नेहमीच ऐकतो. परंतु आज ते दिवस राहिलेले नाहीत. आजची परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे डोळ्यात अश्रू आणण्याचे कारण नाही. कराड ही वीरांची भूमी आहे. येथील युवा वर्ग म्हणजे येथील वाघ असून भविष्यात ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगती करताना दिसतील. या परिसरातील युवक सैन्यात भरती होण्यासाठीही नेहमीच इच्छुक असतात. त्यांच्या मनात येथे ठेवण्यात आलेल्या आयुधांमुळे सैन्य दलाबाबत नेहमीच आपुलकीचे नाते निर्माण होऊन ते प्रेरणादायी ठरतील.

नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी कर्नल संभाजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लष्करातील विमान व रणगाडे मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच त्यांच्यामुळे कराडच्या वैभवात आणखीनच भर पडली असून पालिका कायमस्वरूपी त्याचे जतन करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
विजय दिवस समारोह समितीचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी प्रास्ताविकात कराड शहराची ओळख उपस्थित पाहुण्यांना करून दिली. ते म्हणाले, कराड शहरातून अनेक थोर मंडळी घडली असून त्यांच्यामुळे कराडचे नाव उज्ज्वल झाले आहे. यावेळी कर्नल जयराम व मेजर वास्को यांनी मनोगते व्यक्‍त केली. ऍड. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.