पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारभारामुळे राज्यात युतीचे सरकार आले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चव्हाणांवर घणाघाती टीका

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात सुरू झाला असल्याचे दिसत आहे. त्यासाठी त्यांनी रोज सभा घेत सरकार आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले असल्याचे दिसत आहे. त्यातच आज त्यांची वणीमध्ये प्रचार सभा झाली यावेळी त्यांनी सरकारसह विरोधकांवरही टीका केली. यावेळी पाच वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारामुळेच त्यावेळी सत्तेत येण्यासाठी भाजप-शिवसेनेला मदत झाली, असा घणाघाती शाब्दिक हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी वणीमधील जाहीर सभेत केला. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील कारभाराचा त्यांच्या पक्षालाही काही फायदा झाला नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी सोमवारी वणीमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष का महत्त्वाचा आहे, हे उपस्थितांना पटवून दिले. महाराष्ट्राला सक्षम विरोधी पक्षाची सध्या गरज आहे. त्यासाठीच मी ही निवडणूक लढवत आहे. सगळेच सत्तेत बसले तर तुमच्याबद्दल कोण बोलणार. विरोधी पक्ष कमजोर असल्यामुळेच सत्ताधारी मंडळी वाटेल ते निर्णय घेत आहेत. लोकशाही व्यवस्थेत सगळ्यात महत्त्वाची भूमिका विरोधी पक्षांचीच असते.

भाजप सरकार आणि त्यांचे नेते वाटेल ते बोलताहेत यावरून त्यांनी जोरदार हल्ला चढविला. दोन दिवसांपूर्वी देशाचे कायदा मंत्री म्हणाले की, चित्रपट चालताहेत म्हणजे देशात मंदी नाही. इतक्‍या मोठ्या पदावरील व्यक्ती असे कसे काय बोलू शकतो. नोटाबंदीमुळे देशात मंदीची स्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या नोकऱ्या जाताहेत. उद्योग बंद पडताहेत. या सगळ्याला मंदी म्हणायचे नाही का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी 30 टक्के सरकारी कर्मचारी कामावरून काढून टाकले जाणार असल्याचे सांगितले होते. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही जाणार आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)