शरद पवारांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता – चंद्रकांत पाटील यांचा दावा

पुणे (प्रभात वृत्तसेवा) – ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर सोशल मीडियासह अनेकांनी खरमरीत प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर पाटील यांनी सारवासारव करत “पवार साहेबांचा अनादर करण्याचा हेतू नसून, राजकीय व्यासपीठावर अनेक नेते अशा प्रकारे बोलतात. टीका करतात, ते गांभीर्याने घेणे चुकीचे आहे,’ असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र, हे वक्तव्य पाटील यांना चांगलेच भोवल्याचे दिसून येते.

“राजकारणात येण्यापूर्वी मला पवार मोठे नेते वाटायचे, मात्र आता कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ असे वक्‍तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते असल्याचे कौतुकही केले. मात्र, पाटील यांच्या या वक्तव्यावर रविवारी दिवसभर राज्य भरातून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेची झोड उठवली. दुसरीकडे सोशल मीडियावरही नेटकऱ्यांनीही पाटील यांना लक्ष्य केले.

प्रकरण वाढत असल्याचे दिसताच पाटील यांनी सायंकाळी पत्रकार परिषद बोलावली. “पवार साहेबांबद्दल मी अनेकवेळा चांगले बोललो, त्यांचे कौतुक केले. त्यावेळी कोणी बोलले नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माझ्यावरही टीका करतात. हे कसे चालते? असा सवाल करत माझ्या दृष्टीने हा विषय आता संपला आहे. ज्यांना पवारांवरची निष्ठा दाखवायची आहे, त्यांनी बोलत राहावे, मी कोणाला घाबरत नाही,’ असेही पाटील सांगितले.

…तरच मनसेसोबत युती नाही 

मनसेबाबत बोलताना पाटील म्हणाले, “राज ठाकरे सामाजिक प्रश्नांवर बोलतात, त्यावर तळमळीने व्यक्त होतात. जोपर्यंत ते परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्यासोबत युती करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांचा मुद्दामून अनादर करत आहेत.

लॉकडाऊन जाहीर करून आर्थिक गाडा उलट्या दिशेने नेण्यापेक्षा कडक निर्बंध करा. समान विचारधारा नसलेले, एक झेंडा नसलेले पक्ष सरकार चालवत आहेत. तर शाळा सुरू करण्याचा निर्णय अविचारी असून 1 जानेवारीनंतरच शाळा सुरू कराव्यात,’ असे पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.