जळोची -राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याबद्दल ट्विटर अकाऊंटद्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बारामती नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव यांनी फिर्याद दिली.
याप्रकरणी वेदश्री 19 आणि राजे हर्षवर्धन शास्त्री या ट्विटर अकाउंट धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अभिजीत जाधव व त्यांचा मित्र अजित कदम हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आहेत. कदम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. देश-विदेशातील राजकीय, आर्थिक, घडामोडींचा पाठपुरावा घेत असतात.
कदम हे आज ट्विटरवरील घडामोडी पाहत असताना त्यांना वेदश्री या ट्विटर अकाउंटवरून शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे तसेच या मजकुराला राजे हर्षवर्धन शास्त्री या अकाऊंट वरून आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर कदम यांनी आक्षेपार्ह मजकूराचा स्क्रीन शॉट जाधव यांच्या व्हाट्सअपवर पाठवला. उपनगराध्यक्ष जाधव यांनी देशात राजकीय तेढ व शत्रुत्व द्वेषाची भावना निर्माण करून पवार यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने ट्विटरवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.