मुख्यसभेत बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी स्वत:च्या उपसूचना केल्या मंजूर
पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या बहुचर्चित “एचसीएमटीआर’ (उच्च क्षमता वर्तुळाकार द्रुतगती मार्ग) प्रकल्पाच्या प्रस्तावाला सोमवारी मुख्यसभेत मंजुरी मिळाली. सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील उपसूचना मान्य करत आणि विरोधी पक्षातील सदस्यांची फेटाळून हा प्रस्ताव बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आला.
विधानसभेची आचारसंहिता येत्या चार-आठ दिवसांत लागण्याची शक्यता आहे. त्याच्या आत सत्ताधाऱ्यांनी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरी देण्याचा चंग बांधला आहे. त्यातीलच “एचसीएमटीआर’ हा देखील एक प्रकल्प आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लक्ष घालून, काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे विधानसभा आचारसंहितेच्या आधी तो विषय मंजूर करणे सत्ताधिकाऱ्यांना क्रमप्राप्त होते. त्यामुळेच त्यांनी बहुमताच्या जोरावर तो मंजूर करून घेतला.
प्रकल्पाच्या प्रस्तावात मूळ आराखड्यात 11 ठिकाणी बदल सूचवले होते. त्या बदलांसह हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. या 11 बदलांमध्ये 4 बदल मोठे आणि 7 किरकोळ असल्याचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले. यामध्ये बालभारती-पौडफाटा या डीपीतील रस्त्यावरून जाणारा मार्ग बदलणे, रामटेकडी येथील “एसआरपीएफ’च्या शस्त्रागाराजवळून जाणारा मार्ग बदलणे, विमानतळाजवळील प्रतिबंधित क्षेत्रातून जाणारा मार्ग बदलणे आणि एरंडवणा ते दत्तवाडी येथून जाणारा मार्ग बदलणे या बदलांचा समावेश असल्याचे पावसकर यांनी सांगितले. तसेच अन्य 7 बदल हे कमी लोकसंख्या बाधित होण्याच्या दृष्टीकोनातून बदल करण्यात आल्याचे, पावसकर यांनी नमूद केले.
सत्ताधाऱ्यांची नियोजनशून्यता, समन्वयाचा अभाव
सत्ताधाऱ्यांनी हा विषय शहर सुधारणा, स्थायी समिती आणि लगेचच मुख्यसभेत आणणे आवश्यक होते. तसे नियोजन न करता ऑडिट समितीच्या सदस्यांची नेमणूक करण्याला आवश्यक सदस्य संख्या नाही या कारणाने शहर सुधारणा समिती तहकूब करण्यात आली. “एचसीएमटीआर’चा विषय घ्यावा याचे नियोजनच पदाधिकाऱ्यांनी केले नाही. त्यामुळे स्थायी समितीमार्फत हा विषय जेव्हा मुख्यसभेत आला तेव्हा हा तांत्रिक मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. अखेर शहर सुधारणा समिती मुख्यसभेनेच स्थापन केली असून, मुख्यसभेला अंतिम निर्णयाचे पूर्ण अधिकार आहेत, असे नगरसचिव सुनील पारखी यांनी स्पष्ट केल्याने हा विषय दाखल करून घेण्यात आला.
बहुमताच्या जोरावर उपसूचना मंजूर
गुलटेकडी मार्केटयार्ड आणि उत्सव चौकाच्या अलिकडे नियोजित उड्डाणपूल असल्याने तो वाचवण्यासाठी हा रस्ता चौकातून न्यावा ही सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांची उपसूचना मुख्यसभेत बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आली. परंतु, वडगावशेरी येथील सरकारी जागेतून हा रस्ता न्यावा ही राष्ट्रवादीचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि महेंद्र पठारे यांची उपसूचना बहुमताच्या जोरावरच फेटाळण्यात आली.