अज्ञावंत नव्हे प्रज्ञावंत व्हावं

उणिवांची जाणीव : प्रा. शैलेश कुलकर्णी

सद्य:स्थितीत आपल्यापैकी प्रत्येकाला सज्ञान होणं अभिप्रेत आणि अपेक्षित असतं. याचाच अर्थ कोणालाही अज्ञानात राहून विचार, वर्तन आणि व्यवहार करणं आवडत नाही, म्हणूनच तसं घडत नाही. कारण अज्ञानातील आनंद हा फार काळ टिकत नसल्याची जाणीव आपल्याला होत असते. आपल्यांत अज्ञानत्व नसावं असं जरी वाटत असलं, तरीही कितीजणांमध्ये सज्ञान होण्यासाठी काही करण्याची तयारी असते, वेळ असतो, त्याचं गांभीर्य असतं? हाच कळीचा मुद्दा आहे. आपण अनेक सुज्ञांना देखील काही वेळा अज्ञानी समजत आणि ठरवत असतो. त्यांच्या उणिवा शोधण्यांत आपण स्वतःला धन्य समजत असतो. आपल्या कर्तृत्वाच्या, वक्‍तृत्वाच्या आणि नेतृत्वाच्या माध्यमातून आपण सुज्ञ, सज्ञानी आहोत म्हणून काही वेळा टेंभा मिरवत असतो. खरं तर इतर कोणाचा तरी कित्ता गिरवत असतो. फक्‍त त्याची जाणीव आपल्याला होत नाही, हीच उणीव म्हणावी लागेल.

आपल्या शिक्षण आणि अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अनेकदा आपल्याला पुरेपूर वापर करता येत नाही, करण्याची आंतरिक इच्छा नसते, काही वेळा तो अधिकार नसतो, त्यांतून फारसा फायदा होण्याची शक्‍यता नसते, गरज वाटत नाही अथवा त्याचं फारसं महत्त्व वाटत नसतं. अगदी लहानपणापासून आपल्या अंगवळणी पडलेली पद्धत आपण स्वीकारत, अंगिकारत असतो. अनेकदा आपण त्या प्रचलित पद्धतीचे गुलामच होऊन बसतो, परंतु आपल्याला त्याची जाणीव होत नसते. का बरं असं होतं? आपल्यामध्ये विचार करण्याची आणि त्या अनुषंगाने वर्तन, व्यवहार करण्याची कुवत नसते का? का बरं आपण अनेकदा भ्रमांत आणि संभ्रमांत वावरत असतो? आपल्या लहानपणापासून घरात, शाळेत, बाहेर, मित्रपरिवार आणि नातलगांमध्ये वावरताना आपल्या मूळ कौशल्याचा, ज्ञानाचा, हुशारीचा का बरं आपण उपयोग करू शकत नाही? त्या दरम्यान आपण आपल्या वयानुसार सज्ञान झालेले नसलो, तरी अज्ञानही नसतो; हेही तितकंच सत्य आहे. लहानपणापासून आपल्या बालमनावर आज्ञेचा पगडा असतो. कोणीतरी सतत आपल्याला आज्ञेत ठेवत असतं. प्रत्येक बाबतीत आपल्याला निरनिराळ्या आज्ञा देत असतं. काही बाबतीत, काही अंशी त्याची गरजही असते, परंतु त्याचं प्रमाण किती असावं हेही पाहणं जरुरीचं नाही का?

आज्ञेचा अभाव
बालपणापासून आपल्या अंगवळणी पडलेल्या सवयीमुळे आपण अनेकदा आज्ञेच्या अधीन झालेले असतो. आज्ञेच्या अभावी आपण विचार, वर्तन अथवा व्यवहार ह्याबाबतीत काही वेळा अनभिज्ञ असतो, अनवधानाने देखील काही करायला सुरुवात करतोच असं नाही. परंतु काही वेळा आपल्याला आज्ञाच मिळत नाही. ही आज्ञा एखाद्या व्यक्तीकडूनच मिळावी लागते असं काही नाही, तर आपल्या ज्ञानेद्रियांकडून जरी मिळाली तरी कार्यकृती सुरू होऊन त्यांतून आपल्या प्रकृतीचं आणि संस्कृतीचं दर्शन घडू शकतं.

अनेकांच्या बाबतीत ती आज्ञा कोणाकडूनच मिळत नाही, परंतु कृती मात्र होत राहते, तेव्हा त्यांतून विकृतीचं प्रदर्शन होत जातं. इतर व्यक्‍तींकडून अथवा स्वतःच्या ज्ञानेंद्रियांकडून आज्ञा न मिळाल्यास आपल्यातील कृतीचा अभाव दिसू लागतो. त्याचा थेट परिणाम आपल्या विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यांच्यावर होताना आपल्याला दिसतो. आज्ञेच्या अभावाची खरंच आपल्याला जाणीव होत नसते का? आपलं वैचारिक मंथन आज्ञेशिवाय होऊच शकत नाही का?

आज्ञेविषयी अज्ञान
प्रत्येक व्यक्‍तीच्या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याच्या संकल्पना भिन्न असतात. प्रत्येक व्यक्तीचा पिंड निराळं व्यक्‍तिमत्त्व घडवत असतो. ज्या वातावरणांत व्यक्‍ती वावरत असते, लहानाची मोठी होते, त्याच वातावरणाचा पगडा त्या व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वावर असल्याचं दिसून येत असतं. जगात काही व्यक्तींना सज्ञान, तर काहींना अज्ञान ठरवलं जात असतं. सज्ञान होणं म्हणजे केवळ शारीरिक वय वाढणं का? निश्‍चितच नाही. व्यक्तीच्या व्यक्‍तिमत्त्वातील वैविध्यपूर्ण गुणसमुच्चय ज्ञानप्राप्ती करण्यासाठी सतत अंतर्मनाला उपकृत करत असतील आणि त्याचा प्रभाव त्यांच्या विचार, वर्तन आणि व्यवहार ह्यांवर सदोदित दिसत असेल, तरच त्या व्यक्‍तीला सज्ञान म्हणता येऊ शकतं.

अन्यथा त्या व्यक्‍तीला अज्ञानाची उपाधी लागणं स्वाभाविक असतं. अनेकांना मिळालेली आज्ञाच कळत नाही, आज्ञेचं महत्त्व कळत नाही, त्याचं गांभीर्य ध्यानांतच येत नाही. अशी व्यक्ती केवळ आज्ञेविषयी अनभिज्ञ असते असं नाही, तर अज्ञानीच ठरत असते. इतरांच्याकडून, वरिष्ठांकडून मिळणाऱ्या आज्ञा तर कळत नाहीतच, परंतु स्वतःच्या ज्ञानेद्रियांकडून आलेल्या अज्ञांच्याविषयी ते अज्ञानी असल्याचं दिसून येतं. ही बाब निश्‍चितच केवळ गंभीर आहे असं नाही, तर त्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकते.

अज्ञावंत
आपल्यापैकी प्रत्येकालाच बालपणापासून घरात आणि शाळेत अज्ञावंत होण्याची शिकवण मिळालेली असते. मोठ्यांची आज्ञा ऐकणं हे अनिवार्य असल्याचं सतत आपल्या अंतर्मनावर बिंबवलं जात असतं. आपल्यावर यथायोग्य संस्कार होण्यासाठी ते त्यादरम्यान जरुरीचं देखील असतं. परंतु जसजसं आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक वय वाढत जातं, तसतसं त्यांत परिवर्तन होण्याची जरुरी असते. ती व्हावी ह्या दृष्टिकोनातून किती जण प्रयत्नशील विचार, वर्तन आणि व्यवहार करत असतात? आपण आयुष्यभर अज्ञावंतच राहावं, असं कोणाला वाटत असतं?

ह्या ठिकाणी काही प्रमाणांत अज्ञान असलेली व्यक्‍ती आज्ञेच्या अधीन राहत असते असं गृहीत धरलं, तर अशा व्यक्‍तीला प्रत्येक बाबतीत आज्ञा मिळाल्याशिवाय कार्यकृती करणं शक्‍य होईलच असं नाही. आपल्या शिक्षण पद्धतीतील उणिवा दरवर्षी अनेक अज्ञावंत निर्माण करत राहतात. त्यांना केवळ मिळालेल्या आज्ञेप्रमाणे कार्याकृती करण्याचं शिकवलं जात असतं. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा वापर करण्याचं त्यांना भानच रहात नसतं. त्यांना बुद्धिजिवी न होता श्रमजिवी बनून राहावं लागतं. का बरं ह्याची जाणीव कोणालाच होत नाही? त्यांनी आयुष्यभर केवळ आज्ञावंत होऊन श्रमजीवी म्हणूनच कार्यरत राहावं का?

प्रज्ञावंत
प्रज्ञावंत होण्यासाठी सामान्यज्ञान आणि प्रगल्भ ज्ञान जसं महत्त्वाचं असतं. तसंच त्या ज्ञानाचा योग्य विनियोग, योग्य समज, उपयोजन आणि व्यवस्थापनही होणं तितकंच महत्त्वाचं असतं. ही प्रक्रिया राबवण्यासाठी नियमित आत्मचिंतन गरजेचं असतं. केवळ एखादी गोष्ट ज्ञात असल्यानं आपण शहाणं, हुशार, प्रज्ञावंत ठरत नसतो, ह्याची सतत जाणीव ठेवणं जरुरीचं असतं. आपल्या विचारांत आणि कृतीत तादात्म्य असणं गरजेचं असतं. अनुभवांच्या संख्येपेक्षा त्या अनुभवांतून मिळालेली अथवा स्वतःहून मिळवलेली शिकवण किती गुणाढ्य आहे, समृद्ध आहे ह्यावर ते अवलंबून असतं, हे प्रत्येकानं सर्वप्रथम ध्यानांत घेतलं पाहिजे. म्हणजे केवळ वय आणि बुद्‌ध्यांक आपल्याला प्रगल्भ बनवतात.

आपला स्वर, संवाद, देहबोली, दृष्टिकोन, भावना आणि त्यांचं प्रकटीकरण, हेतू, धोरण, विचारधारा, आचार, कार्यपद्धती योग्य प्रमाणात नियंत्रित ठेवून, स्वत:च्या तसंच इतरांच्या मानसिकतेचा स्वीकार आणि आदर ठेवून, सहअनुभूतीनं, सक्रियपणे, वस्तुनिष्ठपणे, जाणतेपणानं आणि डोळसपणे आपला कार्यभार सांभाळणारे, पुढे नेणारे, नात्यातील भूमिका बजावणारे आणि त्यातील विशेषता, वैविध्य जपणारे, स्वीकारणारे तेच खरे “प्रज्ञावंत’ असतात. खरं तर, हे स्वभाव आणि आचारविशेष आपल्याला नवीन नाहीत. त्यांचं ज्ञान आपल्याला नाही, असं बिलकुल नाही, परंतु त्याचं भान आपल्याला राहत नाही, हीच खेदाची बाब आहे. प्रज्ञावंतता म्हणजे नेमके काय? प्रज्ञावंत कोण? शाळेच्या वर्गात प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी म्हणजे प्रज्ञावंत का, याचं उत्तर जाणून घेणं गरजेचं नाही का?

खरं तर प्रज्ञावंत कोण अथवा प्रज्ञावंतता कशाला म्हणायचं? ह्याविषयी फार काही चर्चा होत नाही. कदाचित त्यासंबंधी मतभिन्नता येण्याची शक्‍यता अधिक असल्यामुळे प्रज्ञावंत असलेली व्यक्ती देखील त्याविषयी स्वतःचं मतप्रदर्शन, प्रकटीकरण करण्यासाठी इच्छुक आणि उत्सुक असल्याचं दिसून येत नाही. स्वतंत्रबुद्धी, विचार करण्याची प्रगत क्षमता, कुतूहल, तीक्ष्ण ग्रहणशक्ती, तर्कशुद्ध विचार, सर्जनशीलता, उत्तम स्मरणशक्ती, तीव्र संवेदनशीलता अशा गुणवैशिष्ट्यांमुळे प्रज्ञावंत व्यक्‍तींच्या शैक्षणिक गरजा भिन्न प्रकारच्या असतात. आपल्या शरीराला व्यायाम देण्यात आपण नेहमीच अग्रेसर असतो, परंतु मनाच्या आयामाचा, व्यायामाचा विचार देखील आपण करतोच असं नाही. आपल्यापैकी प्रत्येकाकडे उपजतच असलेल्या बौद्धिक संपदेची, संपत्तीची स्वतःच जाणीव करून घेऊन प्रत्येकानं अज्ञावंत नव्हे तर प्रज्ञावंत व्हावं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.