“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे वसूली चालू होती असं स्पष्ट सांगावं”

भाजपच्या किरीट सोमय्या यांची सरकारवर सडकून टीका

मुंबई : सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी हे अनिल देशमुख यांची तर कपिल सिब्बल हे राज्य सरकारची बाजू मांडणार असल्याचे समजत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत उपलब्ध झाल्यावर देशमुख हे तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. दरम्यान या सर्व घडामोडींवरुन भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी टीका केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आरोप केले आहेत. “जे सचिन वाझेंनी केलं तेच परमबीर सिंह यांनी केलं; अनिल देशमुख यांनीदेखील तेच करावं. सचिन वाझेंनी सगळ्यांची नावं दिलेली दिसत आहेत, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख सांगत होते अशी माहिती दिली असून तसंच अनिल देशमुख यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे माझी वसूली चालू होती असं स्पष्ट सांगावं. म्हणजे विषय तिथेच संपेल,” असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

“माझ्याकडे अनेक कागदपत्रं आहेत ज्यामधून हे फंड कलेक्शन वरपर्यंत जात होतं आणि त्याचे अनेक लाभार्थी असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून अनिल परब हे हॅण्डलर होते. शरद पवारांनी अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न का केला? कारण स्पष्ट आहे…की लाभार्थी. माझ्या माहितीप्रमाणे आणखी चार लाभार्थी आहेत. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले…याशिवाय आणखी चार लाभार्थींची नावं बाहेर येणार,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, “अजून तर सीबीआयने तपास सुरु केलेला नाही. एनआयए, सीबीआय आणि यानंतर ईडीपासून इतर सगळ्या यंत्रणा जेव्हा कामाला लागणार तेव्हा ठाकरे सरकारचे अर्धे डझन आऊट होतील”.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.