खडकवासला –सिंहगड तसेच परिसरातील मंदिरांना ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला आहे. गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि निसर्ग यामुळे पर्यटनाला मोठा वाव आहे. सरकारने सिंहगड, पानशेत, खडकवासला यांचा विकास पर्यटनस्थळे म्हणून करावा. यातून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, अशी मागणी येथील छोटे-मोठे उद्योजकांकडून होऊ लागली आहे. याबाबत एकत्रितरित्या पुणे महानगरपालिका तसेच राज्य शासनाकडे निवदेनही देण्यात येणार आहे.
खडकवासला धरणाच्या पश्चिम भागात पर्यटन क्षेत्राला मोठा वाव आहे. यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. या परिसरातील पाणी पुरवठा, रस्ते व पार्किंगची व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक आदी मुद्यांवर आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केल्यास या भागाचा सर्वांगिण विकास वेगाने होऊ शकेल, अशी मागणीही अनेकांकडून पुढे
येत आहे.
तरुणांच्या हातांना काम मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला दाम हवा. नोकर भरती सुरू केल्यावर अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत.
-धनराज जोरी, युवा नेते
सिंहगड परिसर विस्तारत आहे. नागरीकरण वाढत आहे. या बाबींचा विचार करून सरकारने सुनियोजित शहर विकासाचा अजेंडा राबवायला हवा.
– दिलीप भालेराव,
माजी उपसरपंच
खडकवासला, पानशेत, वरसगाव याठिकाणी पर्यटक व भाविकांचा बारा महिने ओघ असतो. पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण कराव्यात.
– संदीप मते, माजी उपसरपंच
पानशेतमधील रस्ते अरुंद आहेत. हे रस्ते प्रशस्त करावेत. परिसर अतिक्रमणमुक्त करावा. वाहनतळ, स्वच्छतागृह, निवासी व्यवस्था करायला हवी.
– अंकुश पासलकर, व्यावसायिक