बाबासाहेब गर्जे
पाथर्डी -तालुक्यातील गुटखा व माव्याची बेकायदेशीर दुकानदारी जोमात असून पाथर्डी – शेवगाव परिसरातील दोन बड्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यातील अवैध व्यवसायिकांच्या धनश्रीने मोहिनी घातली आहे. लक्ष्मीची दमदार पावले घर चालत येत असल्यामुळे संबंधित अधिकारीही व्यावसायिकांवर अक्षरशःफिदा असून पोस्टमनची भूमिका इमाने-इतबारे बजावत आहेत.
या अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे अद्यापपर्यंत कुठलीच मोठी कारवाई झाली नाही.
महाराष्ट्र शासनाच्या खाण्यापिण्याशी संबंधित असलेल्या विभागात दोघांचाही देवाण-घेवाणीमुळे प्रचंड नावलौकिक आहे. वरिष्ठांच्या कृपाशीर्वादाने नगर जिल्ह्यातील दक्षिण व उत्तर हे दोन भाग दोघांनी वाटून घेतले आहेत. पाथर्डी शेवगाव परिसरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमलेल्या भूमिपुत्रांचा यापुर्वीचा इतिहास वादग्रस्त ठरलेला आहे. सध्याही गावाकडची ओळख कामी आली असून त्यामाध्यमातून खबऱ्यांचे मोठे जाळे तयार झाले आहे.
शेवगाव व पाथर्डी तालुक्याला स्वतंत्र वसुली यंत्रणा आहे. शहर व ग्रामीण भाग अशी विभागणी करून स्वतंत्र वसुली अधिकारी नेमण्यात आलेले आहेत.खबऱ्यांना व वसुली अधिकाऱ्यांना चांगली कमाई होत असल्याने त्यांच्यातही स्पर्धा निर्माण झाली आहे.” कमवा अन् कमवून द्या’ या नीतीचा वापर करत गडगंज संपत्ती कमावली आहे.
या सुत्रामुळे अवैध व्यवसायिकांनीही कोटीची उड्डाणे पूर्ण झाली आहे. कोणीही आले तरी माझे नाव सांगा असे छातीठोकपणे सांगीतले जात असल्याने मावा गुटखा व्यवसायिक कोणालाही मोजायला तयार नाही. अवैध मावा गुटखा विक्रीची प्रचंड चर्चा होऊनही अद्याप एकही अधिकारी तालुक्यात फिरकलेला नाही. तालुक्यात गुटखा व माव्यामुळे कॅन्सरसारखे आजार होऊन अनेकांनी जीव गमवला. हजारो महिला कमी वयात विधवा झाल्या. व्यसनाधीनतेमुळे सध्याच्यातरुणांमध्ये नैराश्य आले आहे. शारीरिक शक्ती कमी झाल्याने घरगुती कलह वाढले आहेत.