कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांना “आयटी’ची प्रश्‍नपत्रिका 

-पुणे विद्यापीठाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
-विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण होण्याची भीती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेत तृतीय वर्षाच्या आयटी शाखेची थेअरी ऑफ कॉम्प्युटेशन विषयाची प्रश्‍नपत्रिका “जैसे थे’ तृतीय वर्षाच्या कॉम्प्युटर शाखेच्या थेअरी ऑफ कॉम्प्युटेशन विषयासाठी देण्याचा अनागोंदी प्रकार शुक्रवारी घडला. या प्रकारामुळे कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रश्‍न समजली नसून, त्यांना उत्तरे लिहिण्यात प्रचंड अडचणी आल्याने ते अनुत्तीर्ण होण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

विद्यापीठाची विविध अभ्यासक्रमांची परीक्षा सुरू आहे. शुक्रवारी आयटी आणि कॉम्प्युटर शाखेचा तृतीय वर्षाचा थेअरी ऑफ कॉम्प्युटेशन विषयाचा पेपर एकाच वेळी दुपारी दोन वाजता होता. आयटीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच अभ्यासक्रमाशी निगडीत प्रश्‍नपत्रिका मिळाल्याने त्यांनी ती सोडवली. त्याचवेळी कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखेची प्रश्‍नपत्रिका देण्याऐवजी आयटी शाखेची प्रश्‍नपत्रिका दिली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका सोडविता आली नाही.

अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्‍नपत्रिका सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभ्यासक्रमाच्या बाहेरचे प्रश्‍न आल्याने त्यांना उत्तरे लिहिता आलेली नाहीत. या संपूर्ण प्रकारामुळे कॉम्प्युटर शाखेचे या दोन्ही विषयाचे नाव एकसारखे असले तरी, अभ्यासक्रम वेगळे आहेत. त्यामुळे कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रश्‍न सोडविण्यात प्रचंड अडचणी आल्या. आपण या परीक्षेत अनुत्तीर्ण होऊ, या भीतीने विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला. मात्र, अनुत्तीर्ण होण्याची भीती त्यांच्या मनात कायम आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

विद्यार्थी तृतीय वर्षात अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासोबतच नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळण्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या प्रकरणात योग्य निर्णय देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. दरम्यान, मंडळाकडे अशी कोणतीही तक्रार आलेली नाही. तरी याची माहिती घेण्यात येईल, असे मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.