नंदूरबार – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेबाहेर दाखवलेले खावटी अनुदान योजनेचे किट बनावट होते, असा दावा आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी केला. तसेच बाजारातून सुटे तेल आणि माल खरेदी करुन तो माध्यमांसमोर दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांनी फडणवीसांवर केला आहे.
नंदूरबार जिल्ह्यात पाडवी यांच्या हस्ते आज खावटी अनुदान योजनेंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किटचे वाटप करण्यात आले. यावेळी पाडवी यांनी फडणवीसांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
के. सी. पाडवी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या काळात आदिवासी विकास विभागाकडून चांगले काम होत असल्यामुळे आदिवासी खातं आणि आपल्याला बदनाम करण्याचा हा कट आहे. भाजपच्या काळातच या विभागात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आपण तोंड उघडल्यास भाजपला महाग पडेल, असा इशाराही त्यांनी फडणवीसांनी दिला.
दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या राड्यानंतर 12 भाजप आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर भाजपने विधानसभेबाहेरच प्रति विधानसभा भरवली.
त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागावर जोरदार टीका केली होती. खावटी अनुदान योजनेतून आदिवासींना अतिश्य निकृष्ट दर्जाच्या वस्तू दिल्या जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता.