देशहिताच्या निर्णयाला विरोध करणे अत्यंत दुर्दैवी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी खूपच महत्वाचा आहे. रविवारचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांनी आपल्या विविध ठिकाणी मोठ्या प्रचारसभांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जळगाव आणि भंडाऱ्यात जाहीर सभा होत आहे. आता नरेंद्र मोदी जळगावमधील सभेला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र उगारले. सरकारने देशहिताच्या दृष्टीने जे निर्णय घेतले त्याला देशातील काही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी विरोध केला हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील आज मेगा दिवस आहे. राज्यातील विविध भागात आज दिग्गज नेत्यांची सभा होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जळगावात सभा सुरू आहे. यावेळी त्यांनी कसं काय आहे जळगाव? म्हणत भाषणाला सुरुवात केली. चार महिन्यांपूर्वी तुम्ही दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार एनडीएवर तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्वांचे आभार असे मोदींनी उपस्थित जनसमुदायाला म्हटले. तसेच पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वात महायुतीला सत्तेत आणण्यासाठी तुमच्या सर्वांचे समर्थन मागण्यासाठी आलो आहे त्यामुळे महाजनादेश देणार का? असा पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारला.

दरम्यान, देशातील काही पक्षांचा आणि नेत्यांचा राष्ट्रहिताच्या निर्णयांचा विरोध दुर्देवी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच जम्मू काश्‍मीर आणि लडाख म्हणजे केवळ जमिनी नाहीत तर त्या आपल्या देशाचा अविभाज्य घटक असल्याचे त्यांनी म्हटले. नव्या भारताचा नवा जोश हा मोदींमुळे नाही तर आपल्या मतांमुळे असल्याचे सांगत 130 कोटी भारतीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आवश्‍यक पावले उचलली असल्याचेही यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटले. तसेच लोकसभा निवडणुकीत महिलांनी मतदान करुन पुरुषांसोबत बरोबरी केली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन पण आता विधानसभा निवडणुकीत पुरुषांच्याही पुढे जाऊन मतदान करायला हवे असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

दरम्यान, आज भाजपचे अध्यक्ष अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सत्ताधारी नेत्यांसोबत विरोधी पक्षातील कॉंग्रेसे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.