धैर्यशील कदमांना निवडून आणण्याची सर्वांची जबाबदारी

आ. लाड : चुकीचे वागणाऱ्यांबाबत निर्णय घेणार

उंब्रज – धैर्यशील कदम शिवसेनेतून उमेदवारी करत असले तरी ते महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्याला निवडून आणणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणारच आहे. या महाराष्ट्रात औषधालाही विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, याची खबरदारी महाराष्ट्रातील जनता घेईन, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आ. प्रसाद लाड यांनी येथे व्यक्त केला.

भाजप-शिवसेनेच्या बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा येथील वरद मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरमधील महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम, प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सरचिटणीस महेंद्र डुबल, आनंदराव शिंदे, उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ आदी प्रमुख उपस्थित होते.

आ. प्रसाद लाड म्हणाले, पक्षांमध्ये शिस्तीला महत्त्व आहे. 1977 पासून मकरंद देशपांडे हातात कमळ घेऊन काम करत आहेत. अशा कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम भाजपने केले. मुंबईचे अध्यक्षपद, खासदार, आमदार अशी विविध पदे भूषविल्यानंतर यावेळी काही अडचणीमुळे किरीट सोमय्या यांना तिकीट मिळाले नाही. परंतु नाराज न होता आजही ते पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहेत.

ही पक्षातील शिस्त आहे. अशा कार्यकर्त्यांचा पक्ष नेहमीच सन्मान करते. अपक्ष उमेदवार घोरपडेंनी बंडखोरी केली असली तरी माझा त्यांना निरोप द्या, अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर करावा. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. महायुती भक्कम करण्यासाठी, भाजपला सक्षम करण्यासाठी, विक्रम पावस्कर यांचे हात बळकट करण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी धैर्यशील कदम यांच्या पाठीशी रहावे. भारतीय जनता पक्ष धैर्यशील कदम यांच्या केवळ पाठीशीच नाही तर पक्षाचे त्यांच्या डोक्‍यावर आशीर्वादाची हात आहेत. त्यामुळे धैर्यशील कदम यांचा विजय निश्‍चित आहे.

अशी खात्री आ. लाड यांनी व्यक्त केली. मकरंद देशपांडे म्हणाले, चुकीचे वागणाऱ्यांची भाजपमध्ये कधीही गय केली जात नाही. उत्तर मध्ये काही लोक जाणीवपूर्वक चुकीचे बोलत आहेत. त्यांचा अहवाल जिल्हाध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला आहे. या मूठभर मंडळींबाबत भाजप योग्य तो निर्णय घेईल.

विक्रम पावसकर म्हणाले, कराड उत्तर मध्ये कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन निश्‍चित आहे. मुख्यमंत्रीच उमेदवार आहेत, असे समजून धैर्यशील कदम यांचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येत्या पाच-सात दिवसांत करावे. प्रत्येक बुथवर धैर्यशील कदम यांना मताधिक्‍य कसे मिळेल याची खबरदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असेही आवाहन पावसकर यांनी केले.

धैर्यशील कदम म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येणार आहे. केंद्रात भाजप शिवसेनेचे सरकार आहेच. उत्तर मध्येही जनतेने आपले मत धनुष्यबाणाला देऊन सर्वसामान्य, शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला विधानसभेत पाठवावे. निष्क्रियतेचा मतदार संघाला लागलेला कलंक पुसून काढावा.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सदस्य सुनील पाटील, भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दिपाली खोत, मतदार संघातील भाजप-शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.