माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ : मोदी

नवी दिल्ली  – माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. करोना लॉकडाऊनमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आयटी क्षेत्रातल्या प्रतिभावंतांनी आपले योगदान सुरू ठेवत अर्थव्यवस्थेला हातभार लावला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांचा गौरव केला.

नॅसकॉम टेक्‍नॉलॉजी ऍण्ड लीडरशिप फोरमला संबोधित करताना मोदी म्हणाले की कोविड साथीच्या या कठीण काळात संपूर्ण जग भारताकडे अत्यंत विश्वासाने पाहत आहे. हा नवा भारत आणखी विकास, आणखी प्रगतीसाठी उत्सुक आहे. अलीकडेच जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय दूरसंचार धोरणाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध योजनांची त्यांनी महिती दिली. भारताला सॉफ्टवेअर उत्पादनांचे जागतिक केंद्र आणि इतर सेवा प्रदाता बनवण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना कोरोना काळात जारी करण्यात आल्या होत्या, त्याविषयीच्या धोरणाचीही त्यांनी माहिती दिली.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा देशातल्या 12 प्रमुख क्षेत्रांमध्ये समावेश करण्याच्या निर्णयाची फळे आता दिसत आहेत.अलीकडेच नकाशा-आरेखन आणि भू-अवकाशीय डेटा नियमनमुक्त करण्याच्या निर्णयामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अप कंपन्यांची इको-सिस्टीम अधिक सक्षम होईल आणि परिणामी आत्मनिर्भर भारत अभियानाला त्यातून बळकटी मिळेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली. युवा उद्योजकांना विविध संधींचा लाभ घेण्याचे स्वातंत्र्य असायला हवे यावर पंतप्रधानांनी भर दिला.

नॅसकॉमची ही 29 वी परिषद येत्या 19 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. राष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या नॅसकॉमचा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. “नव्याने पूर्वपदावर येण्यासाठी भविष्यनिर्माण’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत 30 पेक्षा जास्त देशांचे 1600 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत 30 हून अधिक उत्पादने सादर केली जाणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.