Pune District | राज्यघटनेचे संरक्षण हे भारतीयाचे कर्तव्य

सासवड, – आशिया खंडातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात भारतीय संविधानामुळे 6742 जाती गुण्यागोविंदाने नांदत आहेत. भारतीय संविधानामुळे सर्वांना समान पत निर्माण झालेली आहे. देशाचे संविधान हे वाचले पाहिजे. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन सर्व युवकांनी पुढे आले पाहिजे. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
सासवड (ता. पुरंदर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुष्पहार संविधान स्तंभासमोर भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील धीवार म्हणाले की, संविधान भारत देशाचा आत्मा आहे. केवळ एक दिवस संविधान साजरे करून फायदा नाही तर बाराही महिने संविधानाचे पारायण झाले पाहिजे. संविधान शाळेत शिकवणे बंधनकारक केले पाहिजे तरच लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव होईल. भारत खऱ्या अर्थाने महासत्ता होईल.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, राष्ट्रीय चर्मकार संघटनेचे मंगेश गायकवाड, संतोष गिरमे, अनिल मसने, सागर जगताप, रोहित ईनामके, संजय टिळेकर, पोपट भोसले, बाळासाहेब पोळ, सुरेश रणपिसे, भगवंत सोनवणे, लक्ष्मण लोंढे, राजू लोंढे, शकुंतला सोनवणे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन बहुजन हक्क परिषद व महा परिवर्तन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सूत्रसंचालन कैलास धिवार यांनी केले. संतोष गिरमे यांनी आभार मानले.




