नवी दिल्ली – कवी फैझ अहमद फैझ यांना हिंदू द्वेष्टे संबोधणे हे इतके अतार्किक आणि हस्यास्पद आहे की त्यावर काही गांभीर्याने बोलणे अवघड आहे. हा कवी पुरोगामी साहित्यिक चळवळीतील अढळ तारा होता, असे प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी सांगितले.
कानपूर आयआयटीने फैझ अहमद यांची हम देखेंगे ही कविता हिंदू द्वेष्टी आहे का? हे तपासण्यासाठी समिती नेमली आहे, यावर अख्तर यांनी हे मत च्यक्त केले.
फैझ यांनी आपले निम्मे आयुष्य पाकिस्तानच्या बाहेर व्यतीत केले. तेथे त्यांचा पाकिस्तानद्रोही म्हणून उल्लेख व्हायचा. त्यांनी हम देखेंगे ही कविता तत्कालीन पाकिस्तानी लष्करी हुकूमशहा झिया उल हक आणि जात्यंध सरकारच्या विरोधात लिहिली, असे अख्तर यांनी सांगितले.
दरम्यान बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधिंद्र भदोरीया यांनीही फैझ अहमद तयांची या कविता हिंदू द्वेष्टे असल्याच्या आरोपावर टीका केली. फैझ अहमद हे पाकिस्तानातील बंडखोर कवी होते. भारत आणि पाकिस्तानातील संबंध मित्रत्वाचे असावेत, असे त्यांचे मत होते. भारत आणि पाकिस्तानातील मैत्रीच्या संबंधांचा पुरस्कार केल्याबद्दल झिया उल हक यांच्या कारकिर्दीत त्यांनी कारावास भोगला होता, असे त्यानी सांगितले.
फैझ अहमद यांची लाज़िम है की हम भी देखेंगे वो दिन की जिसका वादा है ही कविता हिंदुविरोधी आहे का? हे ठरवण्यासाठी नुकतीच कानपूरच्या द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) समिती स्थापन करण्यात आली आहे. काही प्राध्यापकांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही समिती स्थापन करण्यात आली.
आयआयटी कानपूरच्या विद्यार्थ्यांनी 17 डिसेंबर रोजी दिल्लीतील जामिया मिलीया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांना सहानुभूती दाखवणारा मोर्चा काढला होता. या मोर्चात विद्यार्थ्यांनी लाज़िम है कि हम भी देखेंगे वो दिन कि जिसका वादा है हे गीत गायले होते. मात्र आयआयटीचे उपसंचालक मनिंद्र अग्रवाल यांनी या गीतावर नंतर आक्षेप घेतला. ते म्हणाले, व्हिडिओत विद्यार्थ्यांनी फैझ यांची कविता म्हटली असल्याचे दिसत आहे. हे काव्या हिंदू
द्वेष्टे आहे.
दरम्यान या प्राध्यापकावर समाज माध्यमांत जातीय विद्वेषक मजकूर टाकल्या प्रकरणी बंदी घालावी अशी मागणी केली आहे. आयआयटी कानपूर विद्यार्थ्यांच्या वेब पोर्टलवर मात्र या गीताचा मुळ अर्थ काय आणि जामियात केलेल्या हल्ल्याला ते कसे लागू होते हे सांगणारा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.