एसटीचे जाताना-येतानाचे आरक्षण एकाचवेळी करणे शक्‍य होणार

60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा

गणेशोत्सवासाठी 27 जुलैपासून प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी

मुंबई: गणपती उत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता जातानाचे व परतीच्या प्रवासाचे आरक्षण एकाचवेळी करणे शक्‍य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली असल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना देखील होणार आहे.

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त 2200 जादा बसेसची सोय केली आहे. या गाड्यांचे आरक्षण 27 जुलै (26 जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाताना-येतानाचे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने 60 दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. यापूर्वी ती 30 दिवस होती. साहजिकच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्याला परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्‍यकता राहणार नाही.

या सुविधेच्या अनुशंगाने संगणकाच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तांत्रिक बदल करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया 26 जुलै रोजी संध्याकाळी 4 ते मध्यरात्री 12:30 पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकीट काढणे अथवा रद्द करणे ही प्रक्रिया करता येणार नाही. 26 तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)