पिंपरी – देशभरात करोनाचे थैमान सुरू असले तरी पिंपरी – चिंचवड महापालिका प्रशासनाला करोनावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेचे सध्या सुरू असलेले कामकाज समाधानकारक आहे. मात्र, असे असले तरी हॉटस्पॉट असलेल्या पुणे शहरातील करोना पॉझिटिव्ह रूग्णांना पिंपरी – चिंचवड महापालिका रूग्णालयात आणणे योग्य नाही, अशी सूचना शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महापालिका प्रशासनाला केली.
शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे यांच्या शिष्टमंडळाने करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली.
तसेच महापालिकेच्या वॉर रूमला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेतर्फे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्क किटही आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर आढळराव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
करोनाबाबत लोकांना अद्याप गांभीर्य नाही. ग्रामीण भागातही हीच परिस्थिती आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये मुंबई, पुणे यासारख्या शहरी भागातून तब्बल सव्वालाख लोक आले आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांनी स्वत:हून क्वॉरंटाईन होण्याची गरज आहे. गावपातळीवर याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.