मंचर ,(प्रतिनिधी) – इंग्रजी माध्यमांच्या आणि मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ताबाबत जोरदार स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवणे आव्हानात्मक जबाबदारी शिक्षकांची आहे.
त्यामुळे शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना घडविल्यास विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडू शकेल.
विद्यार्थ्यांना दहावी, बारावीला किती गुण मिळाले हे महत्त्वाचे असते. तरी विद्यार्थ्यांचे आवडीच्या विषयावर किंवा त्यांना इतर विषयांवर देखील शिक्षण देण्याची शिक्षकांची तसेच आपल्या सर्वांची जबाबदारी असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा दर्जा कायम टिकवून ठेवणे गरजेचे असल्याचे मत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात संपन्न झाली. या प्रसंगी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्रशेठ शहा, पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, कैलास बुवा काळे, शरद बँकेचे संचालक अजयशेठ घुले,
सागर काजळे, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, जनाबाई उगले, संतोष डोके, ज्येष्ठ पत्रकार डी. के. वळसे पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे,शिवाजी राजगुरू, पतसंस्थेचे सभापती नारायण गोरे, दत्तात्रय मेचकर, बाबाजी गाढवे, बाळासाहेब सैद, मीनाक्षी वळसे पाटील, सुरेखा तोडकर, शंकर गवारी,विकास बाणखेले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहकारमंत्री वळसे पाटील म्हणाले की, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला.
ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असून तालुक्यातील इतर संस्था चांगल्या पद्धतीने काम करतील. यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. आंबेगाव तालुक्यातील मुलांसाठी विविध इंजीनियरिंग कॉलेज व इतर विद्यालय, महाविद्यालय आहेत.
आदिवासी मुलांसाठी आश्रम शाळा, निवासाची सोय करण्यात आली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी हव्या त्या सर्व गोष्टी उपलब्ध करण्याचे काम केले जात असून विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून यश संपादन करणे गरजेचे असल्याचेही वळसे पाटील यांनी सांगितले.
माजी खासदार आणि पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले आंबेगाव तालुका हा विकसित तालुका असून सहकार, शिक्षण, संस्कृती या सर्वांच्या बाबतीत तालुक्याचे नाव आदराने घेतले जाते.
आंबेगाव तालुक्यात वळसे पाटील व माझ्या माध्यमातून अनेक कामे झाले असली तरी तालुक्याला खूप जुनी परंपरा लाभली आहे. वार्षिक सभेचे नियोजन कान्होबा डोंगरे, संतोष पोखरकर, अभिजीत नाटे,
सखाराम मुंजाळ, सोपान सैद, बाळू साबळे, संजय केंगले,संतोष लबडे, नंदकुमार चासकर यांनी केले. पतसंस्थेच्या प्रगतीबाबत सभापती नारायण गोरे यांनी माहिती दिली. भास्कर चासकर यांनी प्रास्ताविक केले.सुनील भेके व तुषार शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार चासकर यांनी आभार मानले.