पुणे : सार्वजनिक, निमसार्वजनिक, संस्थात्मक, शैक्षणिक व इतर वापराच्या इमारतीमध्ये ज्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात काम करतात, अशा इमारतींमध्ये स्तनपान करणाऱ्या स्रिया, गरोदर महिला व नवजात बालकांच्या माता व सहा वर्षांखालील मुले व मातांसाठी हिरकणी कक्ष उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये नव्याने तरतूद करण्यात आली आहे.
सार्वजनिक, निमसार्वजनिक अशा इमारतींमध्ये महिला कक्ष नसल्यामुळे महिलांना अडचणी निर्माण होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने महिला व बाल विकास विभागानेही हिरकणी कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर नगर विकास विभागाने सार्वजनिक, संस्थात्मक अशा इमारतीमध्ये महिला कक्षची सेवा पुरविणे बंधनकारक करण्यासाठी युडीपीसीआर नियमावलीमध्ये नव्याने तरतूद समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे मत नोंदविले आहे. त्यानुसार सार्वजनिक, संस्थांत्मक इमारतींमध्ये हिरकणी कक्ष उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इमारतीच्या तळमजला अथवा पहिल्या मजल्यावर हिरकणी कक्ष स्थापन करण्यात यावा, स्वच्छतागृहाची सुविधा असावी, आवश्यक तो उजेड, हवा खेळती राहावी, असे निकष ठरविण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना नगर विकास विभागाच्या सहसचिव डॉ. प्रतिभा भदाने यांनी जारी केली आहे.