पुणे – करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता उद्यापासून (दि.10) विद्यापीठाचे प्रवेशद्वार पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठ बाहेर जायचे असेल, तर विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून पास घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी घरात राहावे, बाहेर फिरू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र विद्यापीठ आवारातील शेकडो कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय विद्यापीठबाहेर मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याचे निदर्शनास ये आहे. त्यामुळे अन्य रहिवांशाचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सुरक्षिततेसाठी काही निर्णय घेतले असून, त्याचे परिपत्रक आज प्रसिद्ध केले.