शैक्षणिक संस्थांना रिक्तपदांची माहिती भरणे बंधनकारक

पुणे – उच्च शिक्षण संचालनालयाच्या कार्यकक्षेतील शैक्षणिक संस्थांना शासनाच्या पोर्टलवर रिक्तपदांची माहिती भरण्यासाठी येत्या 25 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, शासकीय अशासकीय अनुदानित व खासगी संस्थांमध्ये मोठ्या संख्येचे विविध पदे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. कायमस्वरुपी पदे न भरल्यामुळे हंगामी किंवा तासिका तत्त्वावर पदे भरण्यात येतात. रिक्तपदांची संख्या जास्त असल्याने त्याचा विपरित परिणाम आपोआपोच शैक्षणिक गुणवत्तेवर होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. संस्थांच्या मंजूर जागा, भरलेल्या जागा, रिक्त जागा यांची एकत्रित संख्या उपलब्ध होण्यात अनेकदा अडथळा निर्माण झाला होता. यामुळे आता केंद्र शासनाने याची गांभीर्याने दखल घेतली असून शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्तपदांची भरती करण्यासाठी समयबद्ध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शन सूचनाही जारी केल्या आहेत. रिक्तपदांची माहिती पोर्टलवर भरण्याबाबत कार्यक्रम आखून त्याबाबतीत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी व त्याचा दैनिक अहवाल पाठविण्यात यावा, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या उपसचिव रोहिणी भालेकर यांनी उच्च शिक्षण संचालकांना दिले आहेत.

1 ऑक्‍टोबर 2017 च्या विद्यार्थी संख्येवर आधारित पदांची अनुज्ञेयता संबंधित सहसंचालक कार्यालयाने अनुदानित महाविद्यालयांना कळविली आहे. त्या माहितीच्या आधारे पद भरतीची मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे रिक्तपदांची माहिती पोर्टलवर भरणे आवश्‍यक आहे. महाविद्यालयांनी परस्पर माहिती भरल्यास त्यात तफावत आढळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सहसंचालकांनी महाविद्यालयांच्या कार्यशाळा आयोजित करून त्यांच्याकडून माहिती प्रमाणित करून भरणे गरजेचे आहे. विद्यापीठे व शासकीय महाविद्यालयांना शासनाने मंजूर केलेल्या आकृतीबंधानुसार रिक्तपदांची माहिती पोर्टलवर भरावी लागणार आहे. उच्च शिक्षण संचालकांकडून प्रमाणित केलेलीच माहिती पोर्टलवर भरता येणार आहे. खासगी संस्था, अभिमत विद्यापीठे, महाविद्यालये यांनाही दिलेल्या मुदतीत माहिती भरण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेशात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.