उठसुट कोणालाही अटक करणे अयोग्यच – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – कायद्यातील तरतूदीनुसार एखाद्याला अटक करण्याची तरतूद असेल तर त्याचा वापर करून सर्रास कोणालाही अटक केलीच पाहिजे असे नाही. व्यक्ति स्वातंत्र्य हा घटनेचा गाभा आहे आणि तो जपलाच पाहिजे असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. असे उठसुठ कोणालाही अटक करण्याने संबंधीत व्यक्तीच्या इभ्रतीवर डाग लागतो आणि तो टाळला पाहिजे असेही कोर्टाने म्हटले आहे.
न्या संजयकिशन कौल आणि न्या. हृषिकेश रॉय यांनी एका प्रकरणात हे मत व्यक्त केले आहे. एखादा आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे किंवा तो समन्स धुडकावण्याची शक्यता आहे असे गृहीत धरून त्याला अटक करून कोर्टापुढे उभे करणे गरजेचे नाही. गुन्हा गंभीर असेल किंवा संबंधीत आरोपीला ताब्यात घेऊन तपास करणे आवश्यक असेल तर अशा व्यक्तीला अटक करणे अयोग्य नाही.
सात वर्षापुर्वी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संबंधात आरोपीने अलाहाबाद हायकोर्टात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले गेले त्या प्रकरणात कोर्टाने हे मत व्यक्त केले. दरम्यान सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द बातल ठरवून संबंधीत आरोपीला जामीन मंजुर केला.
या आरोपींनी तपास कामात पोलिसांना सहकार्य केले आहे, त्याच्यावरील आरोपपत्रही तयार आहे आता केवळ आरोपपत्र दाखल करण्यासाठी या आरोपीला अटक करण्याची गरज काय आहे असा सवालही कोर्टाने विचारला आहे. अटकेच्या संबंधातील अधिकार आणि त्याच्या वापरासाठीचे कारण यातील मलभूत फरक तपास अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवा असेही सुप्रीम कोर्टाने या खटल्याच्या बाबत म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाची ही निरीक्षणे देशातील अन्य प्रकरणांच्या बाबतीत उपयोगी पडणारी आहेत.





