हे तर घोटाळेबाज सरकार – हुसेन दलवाई

पुणे – गेल्या पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील अनेक घोटाळे बाहेर आले आहेत. हेच घोटळ्याचे पैसे सरकार निवडणुकांसाठी वापरते. त्यामुळे हे सरकार घोटाळेबाज असल्याची टीका कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी बुधवारी येथे केली. तसेच देशात मोदींविरोधात सुप्त लाट असल्याचे चित्र असून अगामी सरकार हे कॉंग्रेस आघाडीच्या घटक पक्षांचे असेल असा दावाही त्यांनी केला.

पुणे लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार शरद रणपिसे, राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रकाश सोनवणे, गोपाळ तिवारी उपस्थित होते.

दलवाई म्हणाले, महाराष्ट्र सरकार हे घोटाळेबाज मंत्र्यांचे सरकार आहे. तूरडाळ घोटाळा, चिक्की घोटाळा, औषध घोटाळा, शैक्षणिक घोटाळा असे अनेक घोटाळे महाराष्ट्रात झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातून परदेशी पळून जाणाऱ्यांची संख्या मोठी असेल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच खालपासून वरपर्यंत हा घोटाळा असून हाचपैसा पुन्हा निवडणुकीसाठी वापरला जातो, असा आरोपही त्यांनी केला.

वंचित आघाडीवर दलित समाज नाराज
प्रकाश आंबेडकर यांनी जहाल मुस्लिम नेते ओवैसी यांच्याशी युती करून वंचित विकास आघाडी स्थापन केल्यामुळे दलित समाज नाराज आहे. हा समाज कॉंग्रेसच्याच पाठीशी आहे. त्यामुळे राज्यात वंचित विकास आघाडीचा कॉंग्रेस आघाडीवर परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच कॉंग्रेसमधून जे राजकीय नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांना सत्तेत रहायचे असल्याने त्यांनी पक्षाला सोडले असून अशा प्रवृत्तीचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.