नवी दिल्ली – एमएसएमई एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल या संघटनेचा लघुउद्योग मंत्रालयाशी संबंध नाही. ही कौन्सिल अनधिकृत असून कौन्सिलतर्फे काही अयोग्य बाबी केल्या जात असल्याचे लघुउद्योग मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे.
ही कौन्सिल स्वतःला लघुउद्योग मंत्रालयाचा भाग असल्याचे भासवून काही अयोग्य बाबी करीत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे जनतेने आणि लघुउद्योजकांनी या कौन्सिलच्या विविध कृतीपासून सावध राहावे, असेही लघुउद्योग मंत्रालयाने म्हटले आहे.
कौन्सिलने संचालकाच्या नियुक्तीसंदर्भात समाज माध्यमांमध्ये काही संदेश पसरविले आहेत. ही कौन्सिल लघुउद्योग मंत्रालयाचे नाव घेऊन काही कामे करीत आहे. या कामाचा लघुउद्योग मंत्रालयाशी संबंध नाही. तसेच या कौन्सिलवरील कोणत्याही नियुक्त्याशी लघुउद्योग मंत्रालयाचा संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कौन्सिलच्या वेबसाइटवरील माहितीनुसार ही कौन्सिल खासगी कंपनी असून धर्मादाय कामासाठी नोंदणी करण्यात आली आहे. कौन्सिलचा भारत सरकारशी काही संबंध नसल्याचे कौन्सिलच्या वेबसाइटवर स्पष्ट करण्यात आले आहे.