“बनावट डीझेल’शी संबंध नाहीच

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भूमिका

नगर -गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभर गाजत असलेल्या बनावट डीझेल प्रकरणाचा आणि माझा दुरान्वयेही संबंध नाही. याबाबत करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावेत, माझे लक्ष विकासकामे करण्याकडे आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चुकीचे काम करत असलेल्यांना पाठीशी घालत नाही. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्याचा निर्णय कोर्टात होईल, असे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले. 

राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बनावट डीझेल प्रकरणात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप केला होता. तसेच मंत्री तनपुरे यांचे विश्‍वासू सहकारी शब्बीर देशमुख यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मंत्री तनपुरे यांनी उशिरा का होईना आपले मत यावेळी मांडले.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वीजपुरवठ्यासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधांसाठी मागील सरकारने काहीच प्रयत्न केले नाहीत. आमचे सरकार अगोदर तिकडे लक्ष देणार आहे. या सुविधा उभ्या करून लोड येत असलेल्या ठिकाणी विभागणी करून
वीजपुरवठा सुरळीत आणि नियमित राहील, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

वीज जोड देण्याचे काम देखील मागील सरकारमुळे रखडले असून, ते देण्याचे काम वेगाने करण्यात येईल. नगर शहरातील जीपीओ चौकात तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून बनावट डीझेल जप्त केले होते. यातील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना पोलिसांनी अटक केली होती.

 

ऑनलाइन शिक्षण सुरुच राहणार..!
शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर मंत्री तनपुरे म्हणाले, 23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला, तरी स्थानिक परिस्थितीचा विचार केला जाणार आहे. परिस्थिती गंभीर असलेल्या ठिकाणी नंतर शाळा सुरू केल्या, तरी चालणार आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्याला शाळेत पाठवायचे आहेत, त्यांनी पाठवावे; मात्र, विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही, तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.