पुणे – पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा चिरून खून केला. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी (दि.21) दुपारी नगर रोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला.
माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डींग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणार्या पित्याचे नाव असून,त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मुळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (30) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशीरा मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्यांचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहीणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करतो. गुरुवारी (दि.20) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्वरूपा या घरी असताना माधव हा राहत्या घरातून मुलगी ही शाळेतून येणार असल्यामुळे तिला घेऊन येतो असे सांगून मुलगा हिम्मतलाही सोबत घेऊन गेला. परंतु, मुलीला बसमधून न घेता बाहेर निघून गेला.
त्याने सोबत मुलालाही नेले. त्यानंतर ते परत माघारी आले नाही. त्यानंतर स्वरूपा यांनी माधवच्या मोबाईलवर फोन केला असता त्याने मी हिम्मतला बाहेर घेऊन सिगारेट पिण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यानंतरमाधव रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही तसेच मुलाला देखील आणून सोडले नाही. यावेळी त्याचा फोन देखील बंद होता. तेव्हा स्वरूपा यांनी नोतवाईकांकडे व आजूबाजूस चौकशी करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कोठेच दोघांचा पत्ता लागत नाही हे लक्षात आल्यानंतर स्वरुपा यांनी 21 तारखेच्या रात्री साडेबारा वाजता चंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
दोन महिन्यापुर्वी माधव याला कंपनीने कामावरून काढून टाकले आहे. तो पत्नी स्वरुपाच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल होताच, चंदनगर पोलिसांनी वेगाने तपासाला सुरूवात केली. दुसरीकडे त्याला घेऊन जाणार्या माधवचा फोन देखील लागत नव्हता. पोलिसांनी तांत्रिकविश्लेषनाद्वारे त्याला शोधून काढले. तो खराडी येथील इलाईट स्टे लॉज येथे असल्याचे समजले. त्यानुसार त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. माधव हा दारुच्या नशेत होता. त्याला बोलण्याची देखील शुद्ध नव्हती.