मुंबई – विविध देशातील रिझर्व बॅंका व्याजदरात वाढ करणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे कालपासून जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही होत असून बुधवारी शेअर बाजाराचे निर्देशांक एक टक्क्याने फकमी झाले.
त्याचबरोबर निर्देशांक सध्या उच्च पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदार नफा काढून घेत असल्याचे वातावरण शेअर बाजारात आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 656 अंकांनी कमी होऊन 60,098 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 174 अंकांनी म्हणजे 0.96 टक्क्यांनी कमी होऊन 17,938 अंकांवर बंद झाला.
बॅंका, माहीती तंत्रज्ञान आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी आज सपाटून मार खाल्ला. इम्फसिस कंपनीचा शेअर करून 2.85 टक्क्यांनी कमी झाला. त्याचबरोबर टीसीएस, विप्रो या कंपन्यांचे शेअर घसरले. एशियन पेंटस्, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली.
अमेरिकेतील व्याज दरवाढीमुळे परकीय संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याची भिती खरी ठरत असून या गुंतवणूकदारांनी काल 1,254 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाल्याचे पाहून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन येथील शेअर बाजाराचे निर्देशांक घसरले. त्यामुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही असे विश्लेषकांनी सांगितले.
टीसीएस वधारणार
टीसीएस या सॉफ्टवेअर निर्यातदार कंपनीच्या शेअरचा भाव सध्या 3,990 रुपये प्रति शेअर या पातळीवर आहे. एकूण परिस्थिती पाहता या कंपनीचा शेअर 4,457 रुपयापर्यंत वाढू शकतो असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेच्या अहवालात म्हटले आहे. ही कंपनी जगभरातील बॅंका, विमा कंपन्या, दूरसंचार कंपन्या आणि वाहतूक कंपन्यांना सॉफ्टवेअर पुरविते.