लिमा – आयएसएसएफ कनिष्ट गटाच्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज अनिश भानवाला, आदर्श सिंह आणि विजयवीर सिद्धू यांनी पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत स्पर्धेचा शेवट केला. या स्पर्धेत भारताने भारताने 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि सहा कांस्यसह एकूण 30 पदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवित दबदबा निर्माण केला.
भारतीय त्रिकुटाने शुक्रवारी जर्मनीच्या फेबियन ओटो, फेलिक्स लुका होल्फोथ आणि टोबियस गोस्एल यांच्याविरुद्ध 10 गुणांची कमाई करत सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेतील दुहेरी ट्रॅप प्रकारात भारतीय नेमबाजांनी वर्चस्व गाजविले.
भारताच्या मानवी सोनीने ज्युनियर दुहेरी ट्रॅप प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. तर याच प्रकारात यशाया हाफिज कॉन्ट्रॅक्टरने कांस्य पदक आपल्या नावे केले. तसेच विनय प्रतापसिंग चंद्रावतने पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप स्पर्धेत 120 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. या सहजप्रीत सिंगने (114) रजत आणि मयंक शोकीनने (111) कांस्य पदक मिळाले.
रिदम सांगवान आणि विजयवीर सिद्धू या भारतीय जोडीने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या खात्यावरील 23व्या पदकाची नोंद केली. रिदम-विजयवीर जोडीने अंतिम सामन्यात थायलंडच्या कॅनयाकॉर्न हिरूनफोइम आणि श्वॅकोन ट्रिनीफॅक्रोन जोडीवर 9-1 असा दिमाखदार विजय मिळवून भारताला 10वे सुवर्णपदक जिंकून दिले. याच प्रकारात तेजस्वनी आणि अनिश भानवाला जोडीने थायलंडच्या शॅविसा पॅडुका आणि रॅम खाम्हाइंग जोडीला 10-8 असे नमवून कांस्यपदक मिळवले.
तत्पर्वी, आयुषी पोद्दार आणि ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर यांनी स्पर्धेत भारताचे वर्चस्व कायम ठेवत 50 मीटर रायफल 3 पोझिशन मिश्रित सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले.
महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात प्रसिद्धी महत, निश्चल आणि आयुशी पॉडर या त्रिकुटाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम लढतीत अमेरिकेच्या एलिझाबेझ मॅक्घिन, लॉरेन झॉन आणि कॅरोलिन टकर या त्रिकुटाने भारताला 47-43 अशा फरकाने हरवले.
दरम्यान, भारताने 13 सुवर्ण, 11 रौप्य आणि सहा कांस्यसह एकूण 30 पदकांसह स्पर्धेचा शेवट केला. तसेच अमेरिकेने 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्यपदकांसह दुसरे स्थान मिळवले.