नवी दिल्ली : भारताकडून चांद्रयान-२ ला मिळालेल्या अपयशानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि उत्साहाने इस्रो चांद्रयान-3 ही मोहीम लवकरच लाँच करणार आहे. याविषयीची माहिती इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के सिवन यांनी दिली आहे.
इस्रोकडून या मोहिमेविषयी माहिती देताना डॉ. सिवन यांनी चांद्रयान-3 चे काम वेगाने सुरू असल्याचे म्हटले. तसेच भूतकाळातील उणिवांपासून धडा घेत भारताचे शास्त्रज्ञ चांद्रयान-3 मोहिमेत परिश्रमपूर्वक काम करत आहेत. यावेळी आम्हाला आमच्या मिशनमध्ये नक्कीच यश मिळेल, असेदेखील त्यांनी म्हटले. सिवन यांनी एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चांद्रयान-2 चा ऑर्बिटर चांद्रयान-3 मिशनमध्ये वापरला जाईल. ते खूप फायदेशीर ठरणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोला तामिळनाडूमध्ये लाँच पॅड बांधले जाणार असून ‘केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने आम्हाला कुलशेखरपट्टणममध्ये भूसंपादनासाठी मंजुरी दिली याचा आम्हांला खूप आनंद आहे. आम्ही लवकरच तेथे देशाचे दुसरे प्रक्षेपण पॅड तयार करू शकू आणि इस्रो लवकरच चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणाबाबत माहिती देईल.”, असे देखील डॉ. के. सिवन यांनी सांगितले.
डॉ. सिवन यांनी करोनामुळे होणाऱ्या परिणामावर बोलताना म्हणाले, ‘आमच्या सर्व प्रकल्पांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे, परंतु या काळात इस्रोने आपल्या रणनीतीवर काम केले, जेणेकरून आम्ही कठीण परिस्थितीतही चांगले व्यवस्थापन करू शकू. महामारीने आम्हांला रॉकेट लाँच करण्याचा एक नवीन मार्ग दिला, जो प्रत्येक मिशनमध्ये लागू केला जाईल.